ठाण्यातील २० पैकी १९ चौक प्रदूषित
हवेचा दर्जा घसरल्याने शहरातील ५ चौक अतिप्रदूषित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : शहरातील रस्त्यावर वाहनांची वाढलेली वर्दळ, सणांमुळे हवेची गुणवत्ता पुन्हा घसरली असल्याचे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण अहवालामधून समोर आले आहे. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी प्रमुख २० चौकात हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्याआधारे तब्बल १९ चौक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. यातील १४ चौकांमध्ये प्रदूषित, तर ५ चौक अतिप्रदूषित असल्याचे या प्रदूषण अहवालात म्हटले आहे. सर्वाधिक प्रदूषण हे हे शिळफाटा चौकात नोंदवले गेले असून त्यापाठोपाठ रेतीबंदर, कॅसल मिल नाका, मुंब्रा फायर स्टेशन परिसर, तसेच बाळकूम नाका हे चौक अतिप्रदूषित आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होत असल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. २०२० मध्ये देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे सर्वच रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. ठाणे शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसर या रहिवासी क्षेत्रात, तर रेप्टाकोस कंपनी या औद्योगिक क्षेत्रात बसविण्यात आलेल्या हवा गुणवत्ता मापन उपकरणांद्वारे शहरातील हवेचे मापन आणि निरीक्षण होते.
टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ पुन्हा सुरू झाली. ठाणे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रदूषण अहवालामध्ये शहरातील प्रमुख २० चौकांत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे. यामध्ये १४ चौक प्रदूषित, तर ५ चौकातील हवा अतिप्रदूषित असल्याचे उघड झाले आहे. शहरातील २० चौकांत हवेची गुणवत्ता तपासण्यात आली आहे, ते सर्वच चौक केवळ कॅडबरी चौक वगळता प्रदूषित असल्याचे या अहवालामधून स्पष्ट झाले आहे.
चौकट
मुख्य चौक हवेची गुणवत्ता
कॅडबरी नाका ९८
मुलुंड चेक नाका १३३
नितीन नाका १५९
बाळकूम नाका २०१
कॅसल मिल नाका २२०
रेतीबंदर २२७
शिळफाटा २३०