इंटर्न डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात
वॉर्ड वॉर रूमच्या सेवेवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : निवासी डॉक्टरांप्रमाणेच आता इंटर्न डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत २५० हून अधिक इंटर्न डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील बहुतांश डॉक्टर पालिकेच्या वॉर रूममध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे वॉर रूमची सेवा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने पालिकेने याची तातडीने दखल घेत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरही मोठ्या प्रमाणात पाॅझिटिव्ह सापडत आहेत. आतापर्यंत ४०० हून अधिक निवासी डॉक्टर बाधित आढळले आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये आधीच डॉक्टरांची कमतरता असल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यात आता इंटर्न डॉक्टरही आजारी पडत असल्याने आरोग्य विभागासमोरील आव्हान वाढले आहे.
इंटर्न डॉक्टरांची संघटना एएसएमआयईचे अध्यक्ष डॉ. प्रतीक देबाजे यांनी सांगितले की, मुंबईतील वॉर्ड वॉर रूममध्ये ३०० इंटर्न डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी १५० हून अधिक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे डॉक्टर पॉझिटिव्ह आल्यानंतर वॉर्ड वॉर रूमच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो. वॉर्ड वॉर रूममध्ये तैनात असलेल्या या इंटर्न्स डॉक्टरांवर येणाऱ्या काॅल्सची जबाबदारी असते. प्रभागामध्ये आढळणाऱ्या कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, होम आयसोलेशनच्या रुग्णांच्या आरोग्याची माहिती घेणे, गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आणि संबंधित रुग्णालयांशी समन्वय साधणे यासोबतच दैनंदिन लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या समस्या सोडवणे, ही जबाबदारी इंटर्न डाॅक्टरांवर असते; मात्र आता प्रत्येक वाॅर रूममधील ४ ते ५ इंटर्न डॉक्टरांना संसर्ग झाल्याचे डाॅ. प्रतीक देबाजे यांनी सांगितले आहे. त्यामुळे वॉर्ड वॉर रूममध्ये डॉक्टरांची कमतरता भासू लागली आहे; मात्र त्यासाठी पालिका प्रशासनाने पर्यायी व्यवस्थादेखील केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त २८० डाॅक्टरांची नियुक्ती
इंटर्न डाॅक्टर कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने प्रत्येक वॉर्डसाठी अतिरिक्त १० डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा पद्धतीने पालिकेने एकूण २८० डॉक्टरांची नियुक्ती केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. त्यामुळे वॉर रूमच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.