खारेगाव उड्डाणपुलाचे आज लोकार्पण
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : गेल्या काही महिन्यांपासून खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले होते. त्यात या उड्डाणपुलाचे राष्ट्रवादीने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे अशी मागणी केली होती, परंतु या पुलाचे लोकार्पण शनिवारी (ता. १५) अखेर राज्याचे नगरविकास मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गिकेवरील कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान खारेगाव रेल्वे फाटक आहे. फाटकाच्या पूर्व दिशेला शाळा, मुख्य बाजारपेठ नसल्याने येथील नागरिक रेल्वे फाटक ओलांडून खारेगाव म्हणजेच फाटकाच्या पश्चिम दिशेला येत असतात. यामुळे अपघातही होत असून लोकल वाहतुकीतही व्यत्यय निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर खारेगाव फाटकाजवळ रेल्वे उड्डाणपूल उभारणीचा निर्णय मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार या उड्डाणपुलाचे काम मध्य रेल्वे प्रशासन आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले.
आता नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही हा पूल काही केल्या सुरू झाला नव्हता. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत होता. त्यानुसार आता पालिका प्रशासनाने या पुलाच्या लोकार्पणाची तयारी करून हा पूल शनिवारपासून सेवेत रुजू होणार आहे.
चौकट
नऊ महिन्यांचा विलंब
गेल्या एप्रिल महिन्यात हा पूल खुला होईल, असे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते, परंतु यात अडचणी आल्यानंतर २० डिसेंबरला हा पूल खुला होईल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरची तारीख पुढे आली होती. त्यानंतर रेल्वेकडून सेफ्टी ऑडिट होणार असून या ठिकाणाहून रेल्वे जाऊ शकेल का? काही अडचणी निर्माण होतील का? यासह पुलाची क्षमताही तपासली जाणार असल्याने विलंब झाला. हे सोपस्कार झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे पालिकेने सांगत ही तारीखही टळली.
राष्ट्रवादी-शिवसेनेत कलगी-तुरा
दरम्यान, या पुलाचे काम आमच्यामुळेच मार्गी लागल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच त्याचे लोकार्पण होईल असा दावा केला होता; तर राष्ट्रवादीने सुरुवातीपासून या पुलासाठी पाठपुरावा केला असल्याने या पुलाचे लोकार्पण पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते केला जाईल, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता; मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.