टाटा प्रोजेक्टला आफ्रिकेत
अडीच हजार कोटींची कामे
मुंबई, ता. १४ ः पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा प्रोजेक्ट्सला आफ्रिकेत वीज वितरण आणि वीज वहन सुविधा उभारण्याची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची कामे मिळाली आहेत. त्यामुळे आता टाटा प्रोजेक्ट्सला परदेशातही वीज वितरण आणि वीज वहन क्षेत्राच्या उभारणीच्या कामात प्रवेश मिळाला आहे.
टाटाला पूर्व आफ्रिकेतील टांझानियात आठ कोटी डॉलरचे; तर पश्चिम आफ्रिकेत चोवीस कोटी डॉलरचे वीज वहन आणि वितरण वाहिन्या उभारण्याचे काम मिळाले आहे. तसेच मालीमध्ये जागतिक बँकेच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या वीज वितरण प्रकल्पाच्या आणि सबस्टेशन विस्ताराच्या कामाचाही यात समावेश आहे. कॅमेरूनमध्येही जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने होत असलेल्या वीजवितरण वाहिनीच्या उभारणीचे दोन कोटी डॉलरचे कामही टाटाने मिळविले, असे टाटा प्रोजेक्ट्सचे राजेशकुमार पांडेय यांनी सांगितले. अनेक गैरसोयी तसेच कोरोनाचा फैलाव या अडचणींवर मात करून या कामातील एक टप्पा वेळेत पूर्ण झाला असून इतर कामेही प्रगतिपथावर आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.