कौटुंबिक वादातून
महिलेची मुलासह आत्महत्या!
चेंबूर ता. १४ (बातमीदार) : चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाल डोंगर परिसरातील अल्टा विस्टा इमारतीत एका महिलेने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलासह इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून महिलेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. श्रुती महाडिक (वय ३७) आणि राजवीर महाडिक (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानूसार, महिलेचे तिच्या पतीसोबत सतत घरगुती वाद होत होते. ती काही दिवसांपूर्वी कुर्लामधील कामगार नगर येथील आपल्या आईच्या घरी रहायला गेली होती. दोन दिवसांपूर्वीच ती पतीच्या घरी आली होती; मात्र आज तिने आपल्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. इमारतीच्या पाठीमागे महिलेने उडी मारल्याने तात्काळ याबाबत कोणाला कळाले नाही. मात्र तेथेच एका इमारतीचे काम सुरू असल्याने एका कामगाराला
महिला मृतावस्थेत दिसली. त्याने ताबडतोब ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवले आहे. महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले होते का, याबाबत चुनाभट्टी पोलिस अधिक चौकशी करीत आहे.