वसई-विरारमध्ये वृक्ष गणना
प्रत्येक झाडाला मिळणार नंबर
वसई, ता. १५ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेच्या क्षेत्रातील वृक्षांचे सर्वधन, जतन करण्यासाठी महापालिकेने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. यानुसार वसई-विरार पालिका हद्दीतील झाडांची गणना करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक झाडाला नंबर देण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक वृक्षाची माहिती महापालिकेकडे उपलब्ध राहणार आहे. या गणनेकरता जीएसआय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
महापालिकेत स्वतंत्र वृक्ष प्राधिकरण विभाग आहे. शहरात रोपे लावणे, देखभाल करणे, उद्याने विकसित करणे यांसह विविध कामे केली जातात. डोंगराळ व मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली जाते. २०१५ साली वृक्षगणना झाली होती. त्यावेळी शहरात १४ लाख झाडे असल्याचे समोर आले. मात्र त्यानंतर वृक्षारोपणाचे अनेक उपक्रम हाती घेतले असल्याने वृक्षसंख्येत निश्चितच वाढ झाली आहे; परंतु अनेक ठिकाणी वृक्षांवर जाहिरात फलक, खिळे, तारा लावून वृक्षांना इजा पोचवली जाते; तर काही ठिकाणी वृक्षांची कत्तल, आग लावणे असे प्रकार घडतात. मात्र आता जीएसआय टॅगिंगमुळे यावर नजर ठेवता येणार आहे. वृक्षांची तोड करताना अथवा त्यांना इजा पोचवताना निदर्शनास आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र नागरिक क्षेत्र वृक्ष संरक्षण, जतन अधिनियम १९७५ च्या ८ / २१ प्रमाणे कारवाई पालिका करणार आहे. शिवाय जीएसआय प्रणालीमुळे पालिकेने लागवड केलेली झाडे व्यवस्थित वाढ होत आहे की नाही यावर देखील लक्ष राहणार आहे.
या योजनेसाठी महापालिका तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करणार असून निविदा काढण्यात आली असून तीन संस्था पुढे आल्या आहेत. याबाबत सविस्तर सादरीकरण केल्यावर निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित संस्थेला पाच वर्षांसाठी देखभालीचे काम दिले जाणार आहे. वृक्षाच्या प्रजातीचे नाव, फळजाती, उंची, रंग, त्याचा उपयोग आदी वर्गीकरणासह त्याला नंबरिंग कोड देण्यात येणार आहे. यासाठी मोबाईल सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे.
वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रात वृक्षगणना केली जाणार आहे. या योजनेत जीएसआय प्रणालीचा वापर होणार असून तांत्रिक सल्लागार नियुक्त करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- चारुशीला पंडित, उपायुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग.