पेण दादर खाडीत अवैध धंदे तेजीत
पेट्रोल डिझेलसह इतर रसायनांची तस्करी; दादर सागरी पोलिसांचे दुर्लक्ष
पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दादर खाडीकिनारी काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलसह इतर रसायनांची तस्करी सुरू आहे. याकडे दादर सागरी पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अशा बेकायदेशीर सुरू असलेल्या धंद्यांना चाप बसावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पेण दादर सागरी हद्दीतील दादर खाडी आणि उरण हद्दीतील वशेणी या ठिकाणी अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू आहेत. त्यामध्ये खाडीमार्गे येणारा पेट्रोल, डिझेल, केमिकल यांसह वटाणा, गोडेतेल, साखर, डाळ यांचाही समावेश आहे. येथूनच त्यांची तस्करी होत आहे. हा धंदा दादर परिसरातील चंदू नामक व्यक्ती करत असून त्याने आजवर या माध्यमातून लाखोंची माया गोळा केली आहे. त्यामुळे अशा अवैध धंद्यांना तत्काळ आळा घालावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. मात्र, याकडे पोलिस प्रशासन, महसूल खाते यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहेत.
देशात कोरोनाने हाहाकार उडवल्याने मध्यंतरी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लावले. त्या लॉकडाऊनमध्ये हा धंदा बंद होता; मात्र आता तो पुन्हा तेजीत सुरू आहे. यात पेट्रोल, डिझेलसह केमिकलची मोठी अवैध पद्धतीने तस्करी होत आहे. तर नुकतेच नवी मुंबई पोलिसांनी छापा टाकून समुद्रावाटे होणा-या पेट्रोल, डिझेल यांची भेसळयुक्त तस्करीचा पर्दाफास केला आहे. यामध्ये पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पेण दादर खाडीत होणारी अशीच अवैध तस्करी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.
--------------------------
दादर सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे कोणतेही पेट्रोल, डिझेल, अथवा इतर केमिकल किंवा वटाणा, साखर यांची तस्करी होत नाही. याबाबत जर असे काही आढळून आले तर आम्हाला कळवावे. त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल.
- गोविंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, दादर सागरी पोलिस ठाणे