नोकरीच्या प्रलोभनाने महिलेची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मेक्सिकोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून एका व्यक्तीने महिलेला २ लाख रुपयांना गंडा घातला. सौम्या शक्ती असे फसवले गेलेल्या महिलेचे नाव आहे; तर नितीन साबळे असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
सौम्या शक्ती या कलिनाच्या मर्सिडीज कंपनीमध्ये काम करतात. २०१२ मध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे एका कंपनीत काम करत होत्या, तेव्हा त्यांची ओळख नितीन याच्याशी झाली होती. नोकरी सोडल्यानंतर काही दिवस नितीन हा सौम्या शक्ती यांच्या संपर्कात होता, नंतर हळूहळू संपर्क कमी झाला. त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा नितीन सोशल मीडियावरून सौम्या यांच्या संपर्कात आला. आपण सध्या मेक्सिकोत नोकरी करतो आणि मुंबईतल्या काही लोकांना त्याने इथे नोकरी मिळवून दिल्याची माहिती सौम्या यांना दिली. त्यांनाही चांगल्या पगाराची नोकरी हवी होती, तेव्हा त्यांनी मेक्सिकोमध्ये जाण्यास संमती दर्शवली. त्यानंतर नोकरीसाठी लागणारी कागदपत्र दिल्यानंतर नितीनने व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी ८ लाख रुपये लागतील, असे सांगितले. पण सौम्याकडे तेवढे पैसे नसल्याने २ लाखांत काम होईल, असे नितीनने सांगितले.
व्हिसाच्या पैशांसाठी मेक्सिकोतल्या एका बँकेचा खाते क्रमांक देण्यात आला. त्यावर सौम्याने पैसे पाठवले. व्हिसाचे कागदपत्र दिल्लीला मेक्सिको दूतावासात अडकले असल्याने नितीनने सौम्याला दिल्लीला जाण्यास सांगितले. दूतावासात कागदपत्र मिळाले नाही, तेव्हा सौम्या पुन्हा मुंबईत आल्या. नितीनला कॉल केला, तर त्याचा फोन बंद होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे सौम्या यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी साकीनाका पोलिस ठाण्यामध्ये नितीन साबळे आणि त्याची सहकारी मोना या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.