दहा हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण
शस्त्रक्रिया केंद्र सुरू करणारी मिरा-भाईंदर पहिली पालिका
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिका हद्दीत गेल्या चार वर्षांच्या कालावधीत तब्बल १० हजार श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महापालिकेच्या उत्तन येथील श्वान निर्बीजीकरण केंद्राची क्षमता वाढवण्यात आल्यास यापेक्षाही जास्त श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
श्वानांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केंद्र सुरू करणारी मिरा-भाईंदर ही राज्यातील पहिली महापालिका आहे. २००४ मध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निराटले या केंद्राची जबाबदारी सांभाळत आहेत. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने हैदराबाद येथील संस्थेला कंत्राट दिले असून प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी महापालिका १०१७ रुपये खर्च करत आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे एक लाखांच्या आसपास असून आतापर्यंत साठ टक्के श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया पार पडली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापालिकेने १०० टक्के श्वानांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी महापालिकेच्या निर्बीजीकरण केंद्राची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे.
सध्याच्या निर्बीजीकरण केंद्रात ४० पिंजरे आहेत. यातील १० पिंजरे हे जखमी श्वानांच्या उपचारांसाठी; तर उर्वरित पिंजरे शस्त्रक्रिया केलेल्या श्वानांसाठी राखीव आहेत. शस्त्रक्रिया केल्यानंतर एका श्वानाला किमान पाच ते सात दिवस पिंजऱ्यात ठेवण्यात येते. त्यानंतर त्याला त्याच्या मूळ जागी पुन्हा सोडले जाते. शहरातील वाढत्या श्वानांच्या संख्येमुळे पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता भासू लागली आहे. दरम्यान, गेल्या एका वर्षात भटक्या श्वानांनी चावे घेतल्याच्या १७१५ घटना घडल्याची नोंद महापालिकेच्या १० आरोग्य केंद्रांत झाली आहे.
वसई-विरार पालिकेने १६० पिंजऱ्यांची क्षमता असलेल्या अद्ययावत श्वान निर्बीजीकरण केंद्राची उभारणी केली आहे. त्या ठिकाणी दररोज ५० ते ६० श्वानांचे निर्बीजीकरण केले जात आहे. या धर्तीवर मिरा-भाईंदर पालिकेनेही भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात आयुक्त दिलीप ढोले यांच्याशी चर्चा झाली आहे.
- प्रशांत दळवी, सभागृह नेते