बैलावर आजीबाईंचा जीव! बिनजोड शर्यतीचा हुकमी एक्का 'विश्वा' | bullock cart race | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bailgada Sharyat
शर्यतीच्या बैलावर आजीबाईंचा जीव

बैलावर आजीबाईंचा जीव! बिनजोड शर्यतीचा हुकमी एक्का 'विश्वा'

sakal_logo
By

अमित गवळे

शेती, बैल हा आमच्या कुटुंबाचा श्‍वास. या प्रेमामुळेच कुटुंबातील प्रत्येक जण बैलगाडी शर्यतीत रमला. अशा शर्यतीवर बंदी आल्याने मन खट्टू झाले होते, पण या काळातही बैलांचा सांभाळ केला. या डोळ्यांनी अनेक शर्यती पहिल्या. आता पुन्हा शर्यतीचे दिवस येत असल्याने आनंद वाटतो, हे शब्द आहेत एका ९० वर्षांच्या आजीबाईंचे. (ninety year old woman celebration and beimg happy about bullock cart race)

पनवेल तालुक्यातील ओवळे गावातील आनंदीबाई मुंगाजी असे त्यांचे नाव. विश्‍वा या शर्यतीच्या बैलांना त्यांनी जिवापाड कसे जपले, हे सांगताना त्यांच्या मिणमिणत्या डोळ्यांत अश्रू तरळले. जानेवारी ते मे महिना हा रायगड जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचा हंगाम. यामध्ये पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत हे तालुके जोमात असतात. काही वर्षांपासून बैलगाडा शर्यतींना असलेली बंदी गेल्या महिन्यात न्यायालयाने सशर्त उठवल्यानंतर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतप्रेमी आनंदून गेले.

हेही वाचा: वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत; पोलिसांनी नोंदवला गुन्हा

पनवेल तालुक्यातील ओवळे गावातील विश्वनाथ मुंगाजी यांच्या परिवारात अनेक पिढ्या बैलांच्या शर्यतीत सहभागी होत आहेत. सध्या त्यांच्या आई आनंदीबाई मुंगाजी आणि त्यांची आठ वर्षांची तीर्था आणि चार वर्षांची मायरा ही शर्यतीच्या बैलाचे संगोपन करतात. त्यांना या बैलाचा लळा लागला आहे. विश्वनाथ यांचा मुलगा रूपेश याने सांगितले, की न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवल्याने आनंद गगनात मावेनासा झाला; मात्र लगेचच कोरोनाचा उद्रेक झाला. त्यामुळे जमावबंदी लागू आहे. आमच्या अनेक पिढ्या बैलगाडा शर्यतीत आहेत. बंदी काळातही बैलांचा घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ केला. आज ना उद्या शर्यतींवरील बंदी उठेल या आशेवर कित्येक बैलगाडा मालक व चालक होते. सशर्त का होईना, पण बंदी उठल्याने बैलगाडा चालक, मालक व शर्यतप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हेही वाचा: Reportaz | बैलगाडा शर्यत टिकवण्याची ''शर्यत'' ! पाहा व्हिडिओ

मुंगाजी यांच्या घरात विश्वा नावाचा चार वर्षांचा शर्यतीचा बैल आहे. १३ महिन्यांचा असताना त्याला २६ हजार रुपयांना खरेदी केला. आता त्याची किंमत १५ लाख आहे. या बैलाला ९० वर्षांची आज्जी आनंदीबाई स्वतःच्या हाताने खुराक देते. त्याचा सांभाळ करते. शर्यती बंद असतानाही विश्वाचा शर्यतीचा सराव जोरात सुरू आहे. बिनजोड शर्यतीत तो हुकमी एक्का ठरेल. याआधी ‘शाहीर’ हा महाराष्ट्रातील एक नंबरचा शर्यतीचा बैल मुंगाजी यांचा होता. सध्या तो म्हातारा झाला आहे. त्याला आराम दिला आहे.

शर्यतींना संपूर्ण महाराष्ट्रात महत्त्व

रायगड, नवी मुंबईतील बैल न्यारे पनवेल, कल्याण, उरण, कर्जत या ठिकाणी ‘बिनजोड शर्यती’ खुल्या मैदानात होतात; तर अलिबागमध्ये समुद्राच्या वाळूवर दोनतीन किलोमीटरच्या शर्यती होतात. शर्यती बघण्यासाठी हजारो नागरिक जमतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कुठेही बैल पळवला तरी रायगड जिल्ह्यात व नवी मुंबईत बैल पळवल्यानंतरच त्याची खरी किंमत किंवा प्रतिष्ठा ठरते. त्यामुळे येथील शर्यतींना संपूर्ण महाराष्ट्रात महत्त्व आहे.

विश्वाचा महागडा खुराक

दररोज सहा किलो उडीद डाळ, पाच-पाच लिटर दूध दोन वेळा, मक्याची कणसे, गाजर व गावठी अंडी असा त्याचा खुराक असून खर्च दिवसाला जवळपास हजार ते बाराशे रुपये इतका आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top