महामार्गावर दोन अपघातांत चार जखमी
मनोर, ता. १५ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज दोन अपघात झाले. कुडे गावच्या हद्दीत झालेल्या अपघातांत तीन दुचाकीस्वार, तर सातीवली गावातील तिहेरी अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. जखमींना मनोरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास महामार्गावर कुडे गावात जाण्यासाठी दुचाकीस्वार मधुकर कुवरा (वय ५०) हे वळण घेत होते. त्याचवेळी गुजरात मार्गिकेवरील भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले आहेत. त्यात कुवरा हे गंभीर जखमी झाले आहेत; तर दुसऱ्या अपघातात महामार्गावरील सातीवली गावच्या हद्दीत आज दुपारी डायमंड हॉटेलसमोर कार बंद पडली होती. या कारला भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुभाजक ओलांडून मुंबई वाहिनीवर उलटल्याने तिहेरी अपघात झाला. या अपघातग्रस्त कंटेनरला दुसऱ्या कार आणि कंटेनरने धडक दिली. यात पहिल्या कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
शुक्रवारी (ता. १४) दुपारी वरई पारगाव रस्त्यावर साखरे गावच्या हद्दीत भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला होता. अपघातग्रस्त कार मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाची ठेकेदार कंपनी जी. आर. इन्फ्रा कंपनीची असल्याची माहिती पुढे येत आहे.
चौकट
दुचाकीस्वाराचा मृत्यू
शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी चहाडे-तांदुळवाडी रस्त्यावर वसरे गावच्या हद्दीत कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जीवराज वासुदेव गांगडे (वय ३०, राह. खडकोली) याचा जागीच मृत्यू झाला.