बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड
भिवंडीत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीचा चितळसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दुकलीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितळसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शोध सुरू असताना भिवंडीतील नारपोली येथील न्यू टावरे कंपाउंडमध्ये काही व्यक्तींची संशयास्पद हालचाल दिसून आली. गणेश बिल्डिंगमधील दुकानाची झडती घेतली असता सिमबॉक्स व वायफाय राऊटरच्या माध्यमातून परदेशातून आलेले कॉल भारतीय क्रमांकावर वळते करण्यात येत होते. या कॉलसेंटरच्या माध्यमातून सरकारचा महसूल बुडत होता. या प्रकरणी शोएब अखिल अन्सारी (२४) व मोमीन ताह इम्तियाज मोमीन (१९) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन सिमबॉक्स, एअरटेल कंपनीचे १९५ सिम कार्ड, वायफाय राऊटर, दोन यु.पी.एस., एक लॅपटॉप असा एकूण दोन लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले.