सोमवारपासून खासगी इंग्रजी
शाळा सुरू होणार का?
मेस्टाच्या घोषणेमुळे पालकांमध्ये संभ्रम
मुंबई, ता. १५ : शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) आपल्याकडे नोंदणी असलेल्या १८ हजार शाळा सोमवारपासून (ता. १७) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून शाळा सुरू करण्यासाठी कोणतीही संमती देण्यात आली नसल्याने पालक संभ्रमात आहेत.
राज्यातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी बहुतांश गोरगरीब विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे राज्यात प्रत्यक्षात शाळा सुरू ठेवण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञ आणि विविध स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. त्यामुळे आम्ही राज्यातील प्रमुख महापालिका वगळता ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोमवारपासून प्रत्यक्ष वर्ग भरविण्याची तयारी करत असल्याचे मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी सांगितले आहे. शाळा सुरू करण्यासाठी आम्ही स्थानिक स्तरावर बैठका घेतल्या असून अनेक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यासाठीचे निवेदनही दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात शाळा बंद असल्याने असंख्य विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडत आहे. तो अभ्यास पुन्हा भरून काढणे कठीण असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडूनही संमतीपत्र दिले जात असल्याचे तायडे-पाटील यांनी सांगितले.
सोमवारपासून मेस्टाकडून सुरू होणाऱ्या शाळांना पालकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे आवश्यक असल्याचे संस्थाचालकांकडून सांगण्यात आले.
--
शिक्षण पूर्ण करणे कठीण
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार पहिली ते पाचवी या वर्गांसाठी वर्षभरात २०० दिवस शाळा सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र मागील दोन वर्षांचा ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी लक्षात घेतला तर वर्षभरात विद्यार्थ्यांचे केवळ १०० ते २०० तास पूर्ण झाले असून अर्ध्याहून अधिक तास बुडाल्याने ते भरून काढणे कठीण झाले आहे. तसेच, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचाही एक हजार तास भरणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र कोरोनामुळे शाळा बंद असल्याने यातील अर्धे तासही पूर्ण झाले नसल्याने शिक्षकांपुढे उर्वरित तास पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिल्याने शाळा सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.