ना. म. जोशी मार्ग
बीडीडीचे काम सुरू होणार!
गृहनिर्माण मंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : वरळी, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे; मात्र या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रथम घर खाली करून संक्रमण शिबिरात जाणाऱ्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीच्या शिष्टमंडळाने गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेऊन पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली. त्यावर गृहनिर्माण मंत्र्यांनी लवकरच येथील पुनर्विकासाच्या कामाला देखील सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.
वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी पुनर्विकासाला सकारात्मक प्रतिसाद देत घरे खाली केली. वरळी, नायगाव येथे कामाला सुरुवात होण्यापूर्वी प्रथम ना. म. जोशी मार्ग येथील पुनर्विकासाला प्रारंभ होईल, असा विश्वास रहिवाशांना होता; मात्र प्रथम काम वरळी येथे सुरू झाले. त्यापाठोपाठ नायगाव येथील एक इमारत पडण्याचे कामही सुरू झाले. ना. म. जोशी मार्ग येथील चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात होत नसल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
पुनर्विकासाबाबत ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीने नुकतीच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. या वेळी आव्हाड यांनी प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन गृहनिर्माण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसहित पुढील आठवड्यात प्रकल्प स्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेईन. तसेच वरळी, नायगावप्रमाणे ना. म. जोशी मार्ग येथेही लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत, असे आश्वासन दिले असल्याचे समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितले.