किरण माने यांनी
शरद पवारांची घेतली भेट
मुंबई, ता. १५ : समाज माध्यमांवर परखडपणे राजकीय मत व्यक्त केल्याने अभिनेते किरण माने यांनी स्टार प्रवाहवरील एका मालिकेतून बाहेर काढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर किरण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांना काढल्यानंतर राजकीय वातावरणही तापले होते.
नेटकरी तसेच काही राजकीय नेतेमंडळी किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे मत काहींनी व्यक्त केले होते.
शरद पवार यांच्या भेटीनंतर किरण माने यांनी सांगितले, की मला भेटीसाठी अर्धा तास देण्यात आला होता. पण ही भेट एक-दीड तास चालली. यावेळी मी त्यांना माझी राजकीय भूमिका आणि
माझ्यावर महिलेने केलेल्या तक्रारीसंदर्भातील सर्व पुरावे दाखवले. त्यांनी माझं बोलणं शांतपणे ऐकून घेतले आहे. मला त्यांनी काही प्रश्नही विचारले.’
चौकट
आज सगळीकडे ‘मुलगी झाली हो’ ही मालिका बंद होणार, अशी अफवा पसरली होती. याबाबत या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या, की आमची मालिका उत्तम सुरू आहे. सातारा-वाई येथे चित्रीकरण सुरू आहे. ही मालिका बंद करण्यात आली तर शंभर ते दीडशे जणांच्या कुटुंबाचा रोजगार बुडेल आणि याला जबाबदार कोण असेल. याचा विचार सगळ्यांनी करावा. आधीच कोरोनामुळे कित्येकांचा रोजगार गेला आहे.