केईएम रॅगिंग प्रकरणी
ॲट्रोसिटीचा गुन्हा
१३ विद्यार्थ्यांसह तीन वरिष्ठांविरोधात तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : केईएम रुग्णालय रॅगिंग प्रकरणात आरोपी विद्यार्थ्यांसह वरिष्ठ अशा एकूण १६ जणांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दलित विद्यार्थ्याची रॅगिंग करत त्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मागील तीन वर्षांपासून अपशब्द वापरून पीडित विद्यार्थ्याची रॅगिंग करत होते. झाडू मारायला, भांडी घासायला लावणे, मृतदेह नेणाऱ्या स्ट्रेचरवर झोपवणे, आदी प्रकारचा त्रास आरोपी त्याला देत होते. यासंदर्भात पीडित विद्यार्थ्याने वॉर्डन सुनील कायुरे, समाधान किटकरी आणि समाधान सोनवलकर यांना माहिती दिली होती. त्यावर कारवाई करायचे सोडून उलट वार्डन डॉ. सुनील कायुरे यांनी पीडित विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांना महाविद्यालयामधून काढून टाकण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. शेवटी पीडित विद्यार्थी घाबरून हिंगोली येथे आपल्या गावी गेला होता. काही दिवसांनी परत आल्यानंतरही त्रास सुरू झाल्याने पीडित विद्यार्थ्याने घडलेल्या सर्व प्रकारची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता, उपअधीक्षक, विभागप्रमुख यांनाही दिली. मात्र त्यांनीही चौकशी समिती गठीत न करता या प्रकाराची दखल घेतली नाही. अखेर याबाबत सामाजिक कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्याने १३ विद्यार्थ्यांसह एकूण १६ जणांविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रुग्णालयाच्या हाॅस्टेलमध्ये पीडित विद्यार्थ्यासोबत राहणाऱ्या त्याच्या रूम पार्टनरचाही समावेश आहे.
कोट
पोलिस या प्रकरणात वेळकाढूपणा करत आहेत. त्यांनी ताबडतोब दोषी आरोपींवर कारवाई करायला हवी. तत्कालीन अधिष्ठाता व अकॅडमिक अधिष्ठाता यांनादेखील पोलिसांनी सहआरोपी करायला हवे. दोन दिवसांत कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- कॉ. सुबोध मोरे, सामाजिक कार्यकर्ते.