'30 ते 40 वर्षांत सुमारे चार हजार बोलीभाषा नष्ट होणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Language
बोली भाषेला रसरशीत ठेवते!

'30 ते 40 वर्षांत सुमारे चार हजार बोलीभाषा नष्ट होणार'

sakal_logo
By

मानवी भाषांचा इतिहास ७० हजार वर्षांचा आहे. लेखन केवळ पाच हजार वर्षे होत आहे. आजही शेकडो भाषा अलिखित आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार देशात १३८० बोलीभाषांची नोंद आहे. बोलीभाषा ही स्वतंत्र भाषा असू शकते किंवा एखाद्या मोठ्या भाषेची पोटभाषा असू शकते. बोली त्या भाषेला रसरशीत ठेवण्याचे काम करतात. प्रमाणभाषा नदीच्या किनाऱ्यांसारख्या असतात, तर या पाण्याचा प्रवाह म्हणजे बोली होय. बोलीतील अभिव्यक्ती जिवंत असते.

जगातील सुमारे सहा हजार बोलीभाषा डिजिटल तंत्रामुळे आणि जागतिकीकरणामुळे धोक्यात आल्या आहेत. येत्या तीस ते चाळीस वर्षांत सुमारे चार हजार बोली नष्ट होतील. या बोलीभाषा नष्ट झाल्या तर समाजातील विविधता धोक्यात येऊ शकते. १९६१ च्या जनगणनेत भारतात १६५२ भाषा होत्या. दहा वर्षांनी १९७१ मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये केवळ १०८ भाषांचा उल्लेख आहे. या नाहीशा झालेल्या भाषांचा शोध घेण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. १९९० मध्ये बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातील प्राध्यापकाची नोकरी सोडून भाषा संशोधन केंद्र ही संस्था स्थापन केली आणि बोलींचा अभ्यास सुरू केला. २००७-२००८ दरम्यान भारत सरकारने भाषांच्या अभ्यासासाठी योजना आखली. त्यासाठी ६०० कोटी रुपये मंजूर केले, मात्र ते काम सरकार पूर्ण करू शकले नाही. आदिवासी जमाती आणि भाषाशास्त्रज्ञांच्या मदतीने मी देशाचा भाषिक सर्व्हे करायचा निश्चय केला. सरकारची मदत न घेता संपर्कातील आदिवासी आणि भाषाशास्त्रज्ञांच्या मदतीने हे काम पूर्ण केले. ९१ पुस्तकांचा संच काढायचे ठरले. त्यातील काही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यात ७८० भाषा आणि बोलींचा अभ्यास आहे. या कामाबाबत दिलीप पाडगावकर यांनी ‘हा जगातला सगळ्यात मोठा इंटलेक्च्युअल प्रोजेक्ट आहे’ असे म्हटले होते, त्यावरून याचे महत्त्व लक्षात यावे.

- डॉ. गणेश देवी, अध्यक्ष, लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रसेवा दल. (शब्दांकन : वैभव चाळके) ...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationLanguage