
गुगलवर शोधलं SBI कस्टमर केअर, भामट्यांनी लावला २.७५ लाखांचा चुना
नवी मुंबई, ता.२० (वार्ताहर): सायबर चोरट्याने निवृत्त पोलिसाला गंडा घालून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल दोन लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळती केली. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी आयटी ॲक्टसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक झालेला निवृत्त कर्मचारी जुईनगर येथे राहतो. गेल्या सोमवारी त्यांच्या एसबीआय बँकेचे युनो ॲप बंद झाले होते. त्यामुळे त्यांनी गुगलद्वारे एसबीआय बँकेच्या ‘कस्टमर केअर’ नंबरचा शोध घेतला. यावेळी सायबर चोरट्याने फसवणूक करण्यासाठी ठेवलेला मोबाईल नंबर त्यांच्या हाती लागल्याने त्यांनी या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी सायबर चोरट्याने एसबीआय बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून पोलिस कर्मचाऱ्याकडून एसबीआय बँक खात्याची आणि त्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती घेतली. तसेच त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सुद्धा मागून घेतला. त्यानंतर सदर भामट्याने त्यांचे इतर अकाऊंट लिंक करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून दुसऱ्या बँक खात्याची माहिती सुद्धा घेतली. त्यानंतर त्यांचे युनो ॲप दोन तासांत सुरू होईल, असे सांगितले.
त्यानंतर भामट्याने पोलिस कर्मचाऱ्याला आर्थिक व्यवहाराचे संदेश जाऊ नयेत यासाठी त्यांच्याकडून घेतलेल्या माहितीचा वापर करून त्यांच्या बँक खात्यावर रजिस्टर असलेला मोबाईल नंबर बदलून त्याऐवजी दुसरा मोबाईल नंबर रजिस्टर करून घेतला. याबाबतचा ई-मेल पोलिस कर्मचाऱ्याला आल्यानंतर त्यांनी तत्काळ एसबीआय व ॲक्सिस बँकेच्या ‘कस्टमर केअर’ला संपर्क साधून आपले तिन्ही बँक खाते ब्लॉक केले. मात्र तोपर्यंत सायबर चोरट्याने त्यांच्या तिन्ही बँक खात्यातून सुमारे दोन लाख ८० हजार रुपये ऑनलाईन दुसऱ्या खात्यात वळते केले. त्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याने नेरूळ ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याच्या टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..