जळगावच्या भोंदूबाबाला डोंबिवलीत अटक
महिलांना ३२ लाखांचा गंडा; दोन दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : कुटुंबावर करणी झाल्याचे सांगत महिलांना ३२ लाख रुपयांचा जळगावच्या भोंदूबाबाने गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, भोंदूबाबा पवन पाटील याला डोंबिवलीतून अटक केली, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी भोंदूबाबाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र पाटील याला अटक केल्याची माहिती दोन दिवसांनंतर का जाहीर करण्यात आली, हे कारण गुलदस्त्यात आहे.
कळवा येथे राहणारे राणे कुटुंब डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहते. या कुटुंबातील आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी आणि कुटुंबावर करणी झाल्याचे सांगत जळगाव येथील पवन पाटील (वय २८) याने त्यांच्याकडून पैसे आणि सोन्याचे दागिने असे एकूण ३२ लाख रुपये उकळले आहेत. डिसेंबर २०१९ पासून पवन या कुटुंबाची फसवणूक करत होता. आपली फसवणूक झाल्याचे समजताच राणे कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि शुक्रवारीच पवन याला अटक केली.
पवन याचे १२ वी शिक्षण झाले असून झटपट पैसे कमावण्यासाठी तो हे काम करीत होता. जळगावमध्ये त्याने अनेक नागरिकांची फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी रामनगर पोलिस ठाण्याचे पथक जळगाव येथे लवकरच रवाना होणार आहे. मात्र तो डोंबिवलीत कधी आणि कोणत्या कारणासाठी आला होता, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याविषयी पोलिसांना विचारले असता केवळ डोंबिवलीतून त्यास अटक करण्यात आली एवढेच बोलून पोलिसांनी अधिक माहिती देण्याचे टाळले. उद्या (ता. २५) पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
चौकट
जळगावला पवन भरवतो दरबार
पवन हा जळगावला दरबार भरवत असून आपल्या अंगात सप्तश्रृंगी माता येत असल्याचे सांगत तो नागरिकांची दिशाभूल करत असे. हातातून खडीसाखर, कुंकू काढून दाखवणे, चांदीची देवीची मूर्ती काढून दाखवत असे. तसेच त्याचे म्हणणे ऐकले नाही तर देवीचा कोप होईल, अशी भीती तो नागरिकांना घालत होता.