गायकरांपाठोपाठ आता जोंधळेही अडचणीत
‘जीटीएस’प्रकरणी मोठा गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता
प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : शासकीय परिवहन सेवेतील (जीटीएस) तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांनी राज्य अतिथींसाठी असलेल्या वाहनांचा गैरप्रकार केल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उघड केले होते. या प्रकरणी चौकशी सुरू असताना आता तत्कालीन संचालक सतीश जोंधळे यांनीही व्हीआयपी वाहनांचा बेकायदा वापर केल्याचे जीटीएस विभागातील वाहनाच्या नोंदवहीतील नोंदींवरून पुढे आले आहे. याबाबतची कागदपत्रे ‘सकाळ’च्या हाती लागली आहेत. त्यामुळे गायकर यांच्या चौकशीनिमित्ताने ‘जीटीएस’मध्ये मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य अतिथींसाठी असलेल्या ‘जीटीएस’ वाहनांच्या गैरवापराबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यानंतर आता त्यांच्याच कार्यकाळात सतीश जोंधळे हे ‘जीटीएस’चे पाच वर्षे संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात तब्बल तीन नियंत्रक बदलले. ‘जीटीएस’च्या संचालक, नियंत्रकांना विभागातील राज्य अतिथींसाठी असलेले वाहन मुंबईतही वापरण्याची परवानगी नसतानाही जोंधळे यांनी खासगी कामासाठी या वाहनांचा वापर केल्याच्या लॉकबुकच्या नोंदीतून समोर आले आहे. एवढंच नव्हे, तर जीटीएस विभागातून बदली झाल्यानंतरही त्यांनी या वाहनांचा वापर केल्याचेही नोंदवहीतून उघड झाले आहे. गायकर यांच्यानिमित्त सुरू झालेल्या चौकशीतून अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी विद्यमान जीटीएस संचालक अशोक साळवे आणि नियंत्रक क्रांती पाटील यांच्यावर दबाव येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
---
तांत्रिक चौकशी प्रलंबितच
राज्य अतिथींच्या वाहनांच्या दुरुस्तीवेळी नव्याऐवजी जुने सुटे भाग वापरून आर्थिक गैरप्रकार केल्याप्रकरणी तांत्रिक अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपवण्याबाबतची माहिती मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी ‘सकाळ’ला दिली होती, मात्र अद्याप ही चौकशीच सुरू झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
----------
जीटीएस अधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी गोपनीय आहे. या संदर्भात काहीही माहिती सध्या देता येणार नाही. वरिष्ठ अधिकारीच अधिक माहिती देतील.
- अशोक साळवे, संचालक, शासकीय परिवहन सेवा.