वृक्षतोडीला मंजुरी दिल्याबद्दल
अजोय मेहता यांच्याविरोधात तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : विलेपार्ले येथील आझाद रोडवरील रस्त्याच्या कडेला असलेले जुने पिंपळाचे झाड तोडण्यात आले. मात्र, ते तोडण्यासाठी २०१८ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पदाचा दुरुपयोग केला. वृक्षतोडीस बेकायदा परवानगी दिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी झोरू भाथेना यांनी केला आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
विलेपार्ले येथील पिंपळाचे झाड पोलिस संरक्षणात पालिकेच्या ‘के’ पूर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी तोडले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर हे झाड तोडण्याची परवानगी तत्कालीन आयुक्त यांनी मंजूर केल्याचे स्पष्ट झाले. १९ जुलै २०१८ रोजी पालिका वृक्ष प्राधिकरणाच्या अहवालानुसार आझाद रोडवरील हे झाड वाहतुकीस अडथळा ठरत होते. त्यासाठी ही परवानगी दिल्याचे सांगण्यात आले.
रस्त्याकडील वृक्षतोड महाराष्ट्र वृक्ष संरक्षण आणि संरक्षण अधिनियम, १९७५ च्या तरतुदींखाली समाविष्ट आहे. त्यानुसार नवे रस्ते वा रस्त्यांच्या बांधकामामुळे आवश्यक झाडांच्या पुनर्रोपणासाठी वृक्ष प्राधिकरण जबाबदार असेल असे म्हटले आहे. विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण पालिका आयुक्त आणि वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष केवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या पुनर्रोपणास मंजुरी देऊ शकतात. मात्र झाड तोडण्यास मंजुरी देण्याचा कोणताही अधिकार त्यांना नव्हता. मात्र, मेहता यांनी वृक्ष अधिनियम १९७५ च्या कलमाचा भंग करून रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडण्यास बेकायदा मंजुरी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
...