बेस्ट बस मार्गातील बदलांवरून राजकारण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : बेस्ट उपक्रमाने सप्टेंबरमध्ये केलेल्या बस मार्गातील बदलांवरून आता राजकरण पेटले आहे. ना. म. जोशी मार्ग आणि साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) येथे बेस्ट प्रवाशांना बस सेवा उपलब्ध होत नसल्याने उलटसुलट प्रवास करावा लागत आहे. बेस्ट सेवेअभावी शेकडो प्रवाशांचे हाल होत आहेत. बेस्ट प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे भाजपने लक्ष वेधले असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
बेस्ट उपक्रमाने १ सप्टेंबरपासून विविध मार्गांवरील बेस्ट मार्ग बंद करण्यासह काही मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यापैकी मध्य मुंबईतही बेस्टवर अवलंबून असलेल्या अनेक भागांत बेस्ट मार्ग बंद केल्याने प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बेस्ट उपक्रमाने ६३, ७४, ७६ या बसच्या मार्गात बदल केले आहेत. त्यासह ३०, ६१, ७७ या क्रमांकांचे बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. बेस्टने यापूर्वी माहीम ते कुलाबा मार्गावर प्रतीक्षा नगर ते मंत्रालय, करी रोड येथून ना. म. जोशी मार्गावरून मच्छीमार नगर ते फोर्ट आर्थर रोड, सात रस्ता, नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रलहून फोर्ट, कुलाबा, मंत्रालयापर्यंत, तसेच वडाळा आगार ते जे. एम. मेहता मार्ग मुंबई सेंट्रल ते तीन हात नाका अशा विविध सेवा सुरू होत्या. ते मार्ग बंद करण्यात आल्याने सात रस्ता, धोबी घाट, करी रोड, डिलार्इल रोड, आर्थर रोड आदी भागांतील बेस्टवर अवलंबून असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
...
स्वाक्षरी मोहीम
बेस्ट प्रवाशांचे होणारे हाल टाळावेत यासाठी भाजपतर्फे रविवारी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यासमोर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. त्यास स्थानिक आणि रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रवासी तक्रार मंच, मुंबईच्या संयोजक नगरसेविका प्रा. आरती पुगावकर यांनी सांगितले, तसेच बेस्ट प्रवाशांच्या मागणीनुसार सेवा उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
...
तक्रारी, सूचना पाठवण्याचे आवाहन
बेस्ट उपक्रमाने १ सप्टेंबरपासून बसमार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचे ठरवले आहे. त्याविषयी काही तक्रारी, सूचना असल्यास प्रवाशांनी त्या पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्याविषयी प्रवाशांनी तक्रारी, सूचना १८००२२७५५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा transport@bestundertaking.com वर पाठवण्याची विनंती केली आहे.