
थंडीत आरोग्य संभाळा! हृदयविकाराचा धोका उद्भवण्याची भीती
कल्याण : वातावरणातील गारवा वाढला (cool climate) असून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. मुळात उन्हाळा व पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी ही प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत असते, पण हिवाळ्यातील हे थंडगार वातावरण अनेक आजारांना निमंत्रण देते. कडाक्याच्या थंडीत फक्त सर्दी-पडसं, खोकला, ताप (Fever and cold) अशाच समस्या उद्भवत नाही तर हिवाळ्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब (High blood pressure) व पक्षाघात यांसारखे गंभीर आजारही शरीराला विळखा घालतात. म्हणूनच थंडीच्या दिवसांत आनंद लुटताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे, असे डॉक्टर सांगत आहेत. हिवाळा म्हणजे साथीच्या आजारांचा काळ असं म्हटलं जातं.
हेही वाचा: भिवंडीत अनैतिक संबंधांतून खून; तिघांना पोलीस कोठडी
हिवाळ्याच्या दिवसाचे आणि खास करून रात्रीचे तापमान कमी होते. त्यामुळे हवेतील सर्व प्रदूषण हवेच्या खालच्या थरात येते, यामध्ये मानवी आरोग्याला घातक विविध वायू आणि सूक्ष्म कण असतात. हीच हवा आपण श्वसनासाठी वापरतो. त्यामुळे श्वसनमार्गाला आणि फुफ्फुसाला सूज येते आणि आजार निर्माण होतात. यात बऱ्याचदा सर्दी, खोकला, ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार उद्भवतात. याशिवाय थंडीमुळे संधीवात किंवा त्वचेचे विकारही होऊ शकतात. कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील संचालक डॉ. अभय गायकवाड म्हणाले, की ‘थंडीमुळे हृदयाच्या नसा आकुंचन पावतात. त्यामुळे हदयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे बऱ्याचदा हृदयविकार किंवा स्ट्रोकचा झटका येऊ शकतो.
ज्या व्यक्तींना आधीपासूनच हृदयाची समस्या आहे, अशांनी थंडीच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे. कारण हृदयरोगाने त्रस्त लोकांमध्ये हार्ट रेट वाढण्याची शक्यता असते. यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. याशिवाय उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना हृदयविकारचा धोका अधिक असतो. तसेच त्यांना ब्रेन हॅमरेजही होऊ शकतो. म्हणून थंडीमध्ये गरम कपडे परिधान करावेत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत मिळते. ‘हदयरोगापासून दूर राहण्यासाठी रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. छातीत दुखणे, दम लागणे, जीभ जड होणे, थकवा जाणवणे किंवा चक्कर येणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या, तसेच कोणतीही व्याधी दुर्लक्षित न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. - डॉ. अभय गायकवाड, कल्याण
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..