अनधिकृत माती उत्खननावर धडक कारवाई
मनोरमध्ये सात ट्रक; एक पोकलेन मशीन जप्त
मनोर, ता. ३१ (बातमीदार) : पालघर तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गौण खनिजाचा वापर सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोईसरच्या मंडळ अधिकाऱ्यांनी खानिवडे गावात केलेल्या कारवाईत अनधिकृत उत्खनन करणाऱ्या सात ट्रक आणि एक पोकलेन मशीन जप्त केली आहे. आजपर्यंत महसूल विभागाकडून केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
पालघर तालुक्यातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जात आहेत. समर्पित रेल्वे कॉरिडॉरचे काम जोरात सुरू आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात मुरूम-खडीचा वापर केला जात आहे. एका कंपनीने समर्पित रेल्वे कॉरिडॉरच्या कामात मुरूम भरावाचे कंत्राट घेतले आहे. त्याकरिता मौजे राणी शीगाव येथील गट क्रमांक ५४ या जागेतील मुरूम उत्खननाची परवानगी घेतली होती, परंतु प्रत्यक्ष जागेवर उत्खनन न करताच पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खानिवडे गावातील गट क्रमांक ६०/१ मध्ये मातीचे उत्खनन सुरू होते. यासाठी चोरट्या पद्धतीने दहा ते पंधरा ट्रकने चोरटी वाहतूक केली जात होती.
बोईसरचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक यांनी शुक्रवारी खानिवडे गावात केलेल्या कारवाईत अनधिकृतरित्या मातीचे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी सात ट्रक आणि एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आली. जप्त केलेले ट्रक बोईसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पोकलेन मशीन खानिवडे गावच्या पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. बोईसरचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक, तलाठी हितेश राऊत, संजय चुरी, रत्नदीप दळवी, सोपान पवार, अनंता पाटील यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.