२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे विधान
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतामध्ये येईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. या सगळ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात, असे सूचक विधान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये केले.
सुभेदार वाडा कट्टा आयोजित राम कापसे स्मृती व्याख्यानमालेस शनिवार (ता. २९) पासून सुरुवात झाली. याप्रसंगी कपिल पाटील म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल, अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही. या सगळ्या गोष्टी केवळ पंतप्रधान मोदी करू शकतात. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी अशा प्रकारचा कायदा केला होता. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याचा पुन्हा भारतामध्ये समावेश होणे, सर्वांची इच्छा आहे.
काश्मीरमधील ३७० आणि ३५ (ए) कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही. नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी संसदेचे संयुक्त अधिवेशन घेत त्यांनी कायदा पारित करून घेतला. काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर परत भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी म्हटले होते. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की, पाकव्याप्त भाग भारतात आणणे, हे तुमचे काम होते, तुमच्याकडून झाले नाही, म्हणून आम्ही करतोय; तर आता आपण वाट बघूया. कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल, अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही, असा दावा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला.
चौकट
कांदे, बटाट्याचे भाव कमी करणे पंतप्रधानांचे काम नाही
महागाईचे कोणी समर्थन करू शकत नाही. आपण महाग मटन, पिझ्झा खातो, मात्र कांदे, बटाटे महाग झाले की चर्चा होते. कांदे, बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यात आले नसल्याचे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले. ३७० कलम असो, की ३५ ए सारखा कायदा असो, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यामुळे कायदे रद्द होऊ शकले. असे धाडसी निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच हवे असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.