शाळांकडे बैठक व्यवस्था तोकडी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळांकडे बैठक व्यवस्था तोकडी!
शाळांकडे बैठक व्यवस्था तोकडी!

शाळांकडे बैठक व्यवस्था तोकडी!

sakal_logo
By
शाळांमधील बैठक व्यवस्था तोकडी नियमांचे पालन करण्यासाठी कसरत अनेक शाळांमध्ये पहिली ते चौथी वर्ग ऑनलाईनच! वसंत जाधव / सकाळ वृत्तसेवा नवीन पनवेल, ता. ३१ ः पनवेल महापालिकेने प्राधिकृत अधिकारी म्‍हणून परिसरातील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र एकाच इयत्तेचे दोन सत्रात वर्ग भरवावे लागत असून सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टिकोनातून शाळांना मोठी कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जात आहे. त्‍यामुळे अनेक शाळांमध्ये पहिली ते चौथी हे वर्ग सुरूच करण्यात आलेले नाहीत. दोन वर्षांत कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला असून सर्वाधिक फटका शालेय शिक्षणाला बसला आहे. मुलांना संक्रमण होऊ नये, यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्‍या होता. गेल्‍या वर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. त्यामुळे शाळेतील किलबिलाट अनेक महिने बंद होता. दुसरी लाट ओसरल्यानंतर पाचवीपासून पुढील वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र कोविडची तिसरी लाट आल्यामुळे पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. आता रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पहिली ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली. राज्य सरकारच्या आदेशानुसार, पनवेल महापालिका क्षेत्रातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे परिपत्रक महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी काढले. परंतु वर्ग सुरू करताना शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करणे शाळांना बंधनकारक आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट घालण्यात आले आहे. त्यामुळे एका तुकडीतील सर्व विद्यार्थी एकाच वेळी वर्गात बसवता येत नाहीत. त्‍यामुळे शाळांना एकाच इयत्तेसाठी दोन सत्रात वर्ग भरावे लागत आहेत. शिक्षकांना दोन वेळा विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळांना पूर्णपणे खबरदारी घ्यावी लागत आहे. कोरोनामुळे शैक्षणिक संस्थांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. काही शाळांमध्ये दिवसाआड वर्ग पनवेल महापालिका क्षेत्रातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये दिवसाआड वर्ग भरवले जात आहेत. हजेरी क्रमांकानुसार दोन ग्रुप तयार करून त्यानुसार शाळा भरवण्यात येत आहे. ऑफलाइनपेक्षा ऑनलाईन सोयीस्कर कोरोनामुळे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शैक्षणिक वर्ष गेल्या वर्षी सुरू केले. तरी पालकांना तेवढेच शुल्क द्यावे लागते.काही शाळांनी शिक्षकांचे पगार सुद्धा कमी केले आहेत. ऑनलाईनमुळे पाणी, वीज बिल आणि इतर सुविधांवरील शाळांचा खर्च वाचतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा दृष्टिकोनातूनही विचार करून शाळांवर ताण येत नव्हता. एकंदरीतच ऑनलाईन शिक्षणामध्ये शैक्षणिक संस्था रमल्या होत्या. परंतु ऑफलाईन शाळा सुरू झाल्याने सर्वच गोष्टींची जबाबदारी शाळांना घ्यावी लागत आहे. बहुतांशी शाळांमध्ये पहिली ते चौथी वर्ग बंदच! राज्य सरकारने पहिली ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याबाबत परवानगी दिली आहे. त्याचबरोबर परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने या बाबत निर्णय घेण्याबाबत असेही आदेश दिले आहेत. पनवेलमध्ये महापालिका आयुक्तांनी शाळा सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे. मात्र अनेक शैक्षणिक संस्थाने पहिली ते चौथी वर्ग सुरू केलेले नाहीत. त्यांना ऑनलाईनच शिक्षण दिले जात आहे. काही ठिकाणी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झालेले आहेत, बाकी ज्या ठिकाणी सुरू करण्यासंदर्भात केंद्र प्रमुखांना सूचना दिल्या गेल्या आहेत. त्या अनुषंगाने पहिले ते चौथीचे वर्ग सर्व ठिकाणी सुरू करण्याची प्रक्रिया चालू आहे. - महेश खामकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पनवेल

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top