
मुंबईत भटके श्वान, मांजरांसाठीही फिरता दवाखाना; पालिकेचा पुढाकार
मुंबई : मानवाच्या उपचारासाठी सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. किंबहुना पाळीव प्राण्यांसाठीही ठिकठिकाणी उपचार केंद्र आहेत; परंतु रस्त्यावर भटकणारे कुत्रे, मांजर तसेच अन्य प्राण्यांवर उपचारासाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत किंवा कोणी अशा प्राण्यांना पशू दवाखान्यात उपचारासाठी नेण्याची तसदीही घेत नाही. उपचाराविना अशा प्राण्यांची मोठ्या प्रमाणात आबाळ होते. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने भटके श्वान, मांजरींसाठी फिरता दवाखाना सुरू केला आहे.
हेही वाचा: मार्चनंतर 7200 पदांची भरती! पोलिस भरतीसाठी अगोदर लेखी परीक्षाच
या फिरत्या दवाखान्याद्वारे कुत्रा, मांजर यांसारख्या छोट्या प्राण्यांवर उपचार केले जाणार आहेत. बरेच जण त्यांच्या पाळीव कुत्र्याची आणि मांजरीची खूप काळजी घेतात; परंतु रस्त्यावर फिरणारी भटकी कुत्री आणि मांजरांकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. अनेक वेळा ते जखमी होतात. मग त्यांची तब्येत बिघडते. पण त्यांच्या या अवस्थेकडे काही निवडक नागरिक लक्ष देतात. अनेकदा इच्छा असूनही नागरिक मदत करू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांचे मोफत उपचार कुठे होतात, हे माहीत नसते. अशा स्थितीत रस्त्यावर राहणारी भटकी कुत्री आणि मांजरांसाठी पालिकेने फिरता दवाखाना सुरू केला आहे.
हेही वाचा: अकोला : पारस औष्णिक विद्युत केंद्राबाबत आज मंत्रालयात बैठक
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन केले. या दवाखान्यात एक डॉक्टर आणि एक सहकारी असेल जे भटके कुत्रे, मांजर आणि इतर लहान प्राण्यांवर उपचार करतील. प्रतिसादानंतर संख्या वाढवणार भटकी कुत्री-मांजरांना दुखापत झाल्यास मलम लावणे, ताप किंवा अन्य समस्या असल्यास औषधे दिली जाणार आहेत. तसेच अँटी रेबिज इंजेक्शनही देण्यात येईल. याशिवाय जर कोणी आपला पाळीव कुत्रा आणि मांजर उपचारासाठी आणले तर त्याच्यावरही उपचार केले जाणार आहेत. मात्र त्यासाठी अल्प शुल्क आकारले जाईल. सध्या आम्ही शुल्क निश्चित केलेले नाही. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात मोबाईल क्लिनिकची संख्या वाढवण्याचा विचार करू, असे डॉ. के. ए. पठाण यांनी सांगितले.
सध्या आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून रुग्णवाहिकेचे मोबाईल क्लिनिकमध्ये रूपांतर केले आहे. हे फिरते क्लिनिक आठवड्यातून तीन वेळा पश्चिम प्रभागाला म्हणजेच अंधेरी पश्चिमेला भेट देणार आहे.
- डॉ. के. ए. पठाण, पालिका पशुवैद्यकीय आरोग्य विभाग.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..