''स्वच्छ पेण''साठी पालिकेची धडपड
शहरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार
राजेश कांबळे : सकाळ वृत्तसेवा
पेण, ता. ३१ : स्वच्छता अभियान देशभर राबवले जात असताना पेण शहरात मात्र जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. पेण शहरालाही स्वच्छतेची शिस्त लागावी, यासाठी नगरपालिका सरसावली आहे. आता सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा घाण करणाऱ्या विरोधात दंड ठोठावण्यात येणार आहे. पालिकेकडून यासाठी १५० ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. या माध्यमातून तरी नागरिक स्वच्छ पेणच्या दिशेने जातील, असा विश्र्वास पेण नगरपालिकेला वाटत आहे.
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पेण शहर वेगाने वाढत आहे. वाढती लोकसंख्या आणि जागोजागी होणारी घर यामुळे शहरात काही वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध सोसायट्यांमधील कचरा घंटागाड्यामार्फत गोळा केला जातो. त्यानंतर तो आंबेगाव येथील कचरा आगारात घनकचरा प्रकल्पाअंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. मात्र, अनेक नागरिक कचरा गाडीत न टाकता तो रस्त्यावर टाकण्यातच धन्यता मानत आहेत. याचबरोबर प्लास्टिकच्या पिशवीवर बंदी असतानाही भाजी, फळ व मच्छीविक्रेते, तसेच अनेक छोटे-मोठे दुकानदार, स्वीट मार्टधारक याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग दिसून येत असून, घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
शहरातील गुरुकुल शाळा, कुंभार तलाव, आरटीओ कार्यालय, अंतोरे रोड अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या आणि शिळे अन्न रस्त्यांच्या कडेला टाकले जाते. यामुळे शहरांतील अनेक ठिकाणी बकाल दृश्य पाहायला मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये, यासाठी यापूर्वीही नगरपालिका प्रशासनामार्फत जनजागृती करण्यात आली. यामध्ये काहीही फरक पडलेला नाही.
अखेर स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२२ च्या अनुषंगाने नगरपालिकेनेही ''स्वच्छ पेण, सुंदर पेण''चा संकल्प केला आहे. शहरातील कचरा कमी करण्यासाठी नगरपालिकेकडून आता सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा घाण करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी १५० ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान, कचरा घंटागाडीतच टाका, असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांनी कचरा हा कचरा गोळा करणाऱ्या गाडीत टाकून तसेच घरातील ओला व सुका कचरा वेगळा करुनच द्यावा नागरीकांनी नगरपालिकेला सहकार्य करावे. आपला शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार तसेच प्लास्टिक व थर्माकोल चे उत्पादन, विक्री, वापर वाहतूक यावर बंदी आहे.
- शिवाजी चव्हाण, आरोग्य अधिकारी, पेण नगरपालिका
ं''स्वच्छ पेण, सुंदर पेण'' ही सर्वांची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून आपल्याबरोबरच परिसराचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी कचरा टाकताना कोणी आढळून आला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण