
‘फिरोदिया करंडका’चा पडदा बुधवारपासून उघडणार
पुणे, ता. ७ ः पुण्याच्या कॉलेजविश्वात अत्यंत मानाची समजली जाणारी यंदाची ‘फिरोदिया आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा’ येत्या बुधवारपासून (ता. ९) सुरू होत आहे. स्पर्धेच्या यंदा दोनच फेऱ्या होणार असून ९ ते १४ मार्चदरम्यान प्राथमिक फेरी व १४ मार्च रोजीच अंतिम फेरी रंगणार आहे.
‘सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे हे ४८ वे वर्ष आहे. बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकामधील नाट्यगृहात बुधवारी सायंकाळी पाच वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. प्राथमिक फेरीत यंदा ३६ संघांनी सहभाग घेतला असून नितीन धंदुके, हृषिकेश रानडे, मुग्धा पाठक आणि सचिन पंडित हे प्राथमिक फेरीचे परीक्षण करणार आहेत. ‘या स्पर्धेत एक संकल्पना निवडून ती संकल्पना नाट्य, नृत्य, संगीत, शिल्प, चित्र, ॲनिमेशन, पपेट शो, शॅडो प्ले, जादू अशा विविध कलांमध्ये गुंफून रंगमंचावर सादर केली जाते. आतापर्यंत या मंचावर अनेक सर्जनशील प्रयोग झाले असून, या स्पर्धेने मनोरंजन विश्वाला दर्जेदार कलाकारही दिले आहेत. यंदाची स्पर्धाही तशीच उत्साहात पार पडेल,’’ असा विश्वास संयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
उद्घाटनावेळी गतविजेत्यांचा सन्मान
या स्पर्धेचे मागील पर्व २०२० मध्ये पार पडले होते. त्या पर्वाचे विजेतेपद सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावले होते. परंतु, कोरोनामुळे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा साजरा झाला नसल्याने त्यांना समारंभपूर्वक करंडक प्रदान करता आला नव्हता. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी गतविजेत्या संघातील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. त्यांचा सन्मान झाल्यानंतर गतविजेता संघ फिरता करंडक संयोजकांना परत करेल आणि त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..