मुंबईत साथीच्या आजारांचे रुग्ण घटले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईकरांचा एकीकडे कोरोनाशी लढा सुरू असताना दुसरीकडे मलेरिया, गॅस्ट्रोसह इतर साथीच्या आजारांनीही डोके वर काढले होते; परंतु कोरोनाप्रमाणे साथीच्या आजारांचा प्रादुर्भावही गेल्या काही दिवसांत कमी होऊन रुग्णसंख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत दुपटीने घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये मलेरियाच्या २८८ रुग्णांची नोंद झाली होती. या तुलनेत जानेवारी महिन्यात मलेरियाचे १५३ रुग्ण आढळले. लेप्टो, गॅस्ट्रो, डेंगी या आजाराचे रुग्णही कमी झाले आहेत.
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पालिकेचा या साथीविरोधात लढा सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना साथीच्या आजारांचाही ताप वाढला होता. त्यामुळे आरोग्य विभागासमोर दुहेरी संकट होते. मात्र, साथीच्या आजारांचे रुग्ण सध्या घटत असल्याने पालिकेवरील ताणही हलका झाला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात मुंबईत मलेरियाचे २८८ रुग्ण आढळले होते. जानेवारी महिन्यात ही रुग्ण संख्या १५३ वर आली आहे. डिसेंबरमध्ये लेप्टोचे ४, तर जानेवारीत फक्त १, डिसेंबरमध्ये डेंगीचे ४० रुग्ण होते. ही संख्या जानेवारीत ७ वर आली. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोचे ४३३ रुग्णांची नोंद झाली होती. जानेवारीत २३९ वर आली; तर डिसेंबरमध्ये हेपेटायटीसचे ३७ रुग्ण आढळले होते. जानेवारीत २५ रुग्णांची नोंद झाली आहे. चिकुन गुनियाचे रुग्ण डिसेंबरमध्ये १२ रुग्ण आढळले होते. ही संख्याही जानेवारीत १ एवढीच आहे. त्यामुळे डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत महिनाभरात तिपटीने घट झाली आहे. दरम्यान, एच१एच१ आजाराचा एकही रुग्ण अद्याप नोंदवण्यात आलेला नाही. ज्याची गेल्या वर्षीही शून्य नोंद होती.
.......
१ ते ३० जानेवारीपर्यंत रुग्णांची स्थिती
मलेरिया - १५३
डेंग्यू - ०७
गॅस्ट्रो - २३९
हेपेटायटीस - २५
चिकुनगुनिया - ०१
लेप्टो - ०१