सुपर स्प्रेडर्सची संख्या नियंत्रणात
आठवडाभरात रुग्णसंख्येत मोठी घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबईतील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असतानाच कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या सुपर स्प्रेडर रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. अवघ्या दहा दिवसांमध्ये लक्षणविरहित रुग्णांची संख्येत तब्बल २७ हजारांची घट झाली. तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही सात दिवसांत पाच हजारांनी कमी झाली आहे.
मुंबईत कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये सुपर स्प्रेडर्समुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे तिसरी लाट सुरू होताच पालिकेने सुपर स्प्रेडर्सवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी रुग्णांचा शोध घेऊन त्यावर पायबंद घालण्यावर पालिकेने लक्ष दिले. सुपर स्प्रेडरचा शोध घेत त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे आता सुपर स्प्रेडरची संख्या घटली आहे.
मुंबईत २० जानेवारीला लक्षणविरहित रुग्णांची संख्या ४३ हजार २४८ होती. पालिकेच्या उपाययोजनांमुळे ३० जानेवारीला ही संख्या १५ हजारापर्यंत खाली आली. सुपर स्प्रेडर्सची संख्या कमी झाल्यामुळे मुंबईत रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यात महापालिकेला यश आले.
.....
सुपर स्प्रेडर्स संसर्गवाढीस कारणीभूत ठरत होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून तिसरी लाट नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.
- डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालय.
....