‘जीटीएस’प्रकरणी जोंधळेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.३१ : शासकीय परिवहन सेवेतील तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर यांच्यापाठोपाठ आता तत्कालीन जीटीएस संचालक सतीश जोंधळे यांच्याविरुद्ध जीटीएस वाहनचालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. जोंधळे यांनी अतिथींच्या वाहनांचा खासगी वापर करण्यासोबतच रजेच्या दिवशीही शासकीय वाहनांचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला असून या प्रकरणाची त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
जीटीएस विभागातील राज्य अतिथींच्या आरक्षित वाहनांचा होणाऱ्या गैरवापराचा ‘सकाळ’ने भांडाफोड केला. दरम्यान, या प्रकरणात जीटीएस वाहनचालक संघटनेकडून यापूर्वीच किशोर गायकर यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. गायकर यांच्या चौकशीदरम्यान सतीश जोंधळे यांचेही गैरप्रकार पुढे आले; मात्र त्याबाबत तक्रार झाली नव्हती. अखेर आता जीटीएस वाहनचालक संघटनेने मुख्यमंत्र्यांसह राजशिष्टाचार विभागाकडे सतीश जोंधळे यांच्याबाबत तक्रार केली आहे.
--
जोंधळे यांच्यावरील आरोप
जोंधळे यांनी त्यांच्या बदलीनंतरही शासकीय वाहनाचा वापर केला आहे. शिवाय शासकीय यंत्रणेमार्फत खाजगी वाहनासाठी इंधन वापरणे, राज्य अतिथींसाठी आरक्षित असलेल्या वाहनांचा संगमनेर, नाशिक तसेच मुंबईबाहेर अनेक ठिकाणी वापर करणे आदी अनेक आरोप करण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारने त्यांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.