सुशोभीकरण कामांची
आदित्य ठाकरेंकडून प्रत्यक्ष पाहणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. अशा पार्श्वभूमीवर निवडणुकीआधी शिवसेनेने शहर सुशोभीकरणाचा धडाका लावला आहे. उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे स्वत: ठिकठिकाणी फिरून या कामांचा आढावा घेत आहेत.
शिवसेनेने शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ केला आहे. मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय उपनगरचे पालकमंत्री वेळोवेळी बैठका घेऊन मुंबईतील सुशोभीकरणाच्या कामाचा आढावा घेत आहेत. उपनगरातील चार संकल्प उद्यान, वांद्रे येथे ट्री वॉक याशिवाय उपनगरातील महत्त्वाच्या चौकांत निसर्गचित्र काढण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत राज्य सरकारने या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
राज्य सरकारच्या निधीतून हे प्रकल्प होत असताना प्रभागांतही लहान-मोठ्या गल्ल्यांचे सुशोभीकरण सुरू आहे. वांद्रे कलानगरातील पदपथांच्या सुशोभीकरणासह वाहतुकीच्या नियोजनासाठी आधुनिक उपाय केले जात आहेत; तर वरळीतील प्रसिद्ध जांबोरी मैदानाच्या सुशोभीकरण करण्यात आले. दादर येथे शिवाजी पार्क मैदानावर पर्जन्यजल संधारण प्रकल्प उभारला जात आहे; तर गिरगाव आणि दादर चौपाटीवर निरीक्षण दालन (गॅलरी) उभारली जात आहे.
यंदा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या वतीने शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रभागातील सुशोभीकरणासाठी निधी पुरवला आहे.
...