एसटीतील २६०० उमेदवारांचा
७ फेब्रुवारीला मंत्रालयावर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : एसटी महामंडळात २०१९ मध्ये दुष्काळग्रस्त भागासाठी काढण्यात आलेल्या भरतीतील २६०० प्रशिक्षण पूर्ण झालेले चालक तथा वाहक तीन वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नियुक्ती होत नसल्याने संतापलेल्या उमेदवारांनी ७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. एल्गार मोर्चाच्या जाहिराती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या असून, मोर्चा नेतृत्वहीन होण्याची शक्यता आहे.
२०१९ मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील सरळ सेवा भरतीतील प्रशिक्षण पूर्ण झालेल्या २६०० चालक-वाहक उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र द्या अन्यथा फाशी द्या, असे मोर्चाच्या जाहिरातीत म्हटले आहे. खासगी कंत्राटी पद्धतीने चालक भरती बंद करा, अशा मागण्या जाहिरातींमधून करण्यात आल्या आहेत. एसटीमध्ये काम मिळणार असल्याने खासगी नोकऱ्या सोडून एसटीच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालो. मात्र, प्रशिक्षण पूर्ण होऊनही तीन वर्षांपासून नियुक्तीच मिळालेली नाही. वेळोवेळी परिवहन मंत्री आणि एसटी प्रशासनाला निवेदन देऊनही गांभीर्याने घेतले जात नसल्याने निवड झालेल्या प्रशिक्षित उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे संदीप ठोके यांनी सांगितले.