शिक्षणासाठी जंगल, होडीतून प्रवास
न्यायालयाकडून साताऱ्यातील विद्यार्थिनींची दखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला, पण शिक्षणासाठी राज्यातील अनेक विद्यार्थिनींना आजही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे, मात्र परिस्थितीपुढे निराश न होता शाळेत जाण्यासाठी असलेली जिद्द आणि धाडस कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने साताऱ्यातील विद्यार्थिनींची दखल घेतली. या मुलींना शाळेत जाण्यासाठी जंगल आणि कोयना धरण पार करत जावे लागते.
शिक्षण घेता यावे म्हणून सातारा जिल्ह्यातील काही मुली स्वतः होडी वलवून कोयना धरण पार करत असल्याची घटनेबाबत न्यायालयाने स्यु मोटो याचिका दाखल केली. सातारा जिल्हा हा विकसनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो; मात्र जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. जावली तालुक्यात खिरखंडी या गावातील मुलींना शाळेत पोहोचण्यासाठी जंगलातून आणि त्यानंतर स्वत:च होडी चालवून कोयना धरणाचा प्रचंड मोठा जलाशय पार करून शाळेत यावे लागत आहे.
जावळी तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात खिरखंडी गावाचा समावेश होतो. सकाळी आठ वाजता गावातील मुली शाळेला निघतात. सुमारे अर्धा तास मुली होडी चालवत कोयनेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जातात. तिथे होडी ठेऊन पुढे जंगलातून पायपीट करत दीड तासानंतर अंधारी गावातील शाळेत पोहोचतात. याबाबत नुकतेच एका दैनिकात वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या वृत्ताची न्या. प्रसन्न वारळे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाने स्यूमोटो याचिका दाखल करून संबंधित न्यायालयाकडे सादर करण्याचे निर्देश न्याय प्रशासनाला दिले.