माजी विद्यार्थी रमले आठवणींत
कोसबाडच्या अध्यापक विद्यालयात स्नेहमेळावा
बोर्डी, ता. १ (बातमीदार) : अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांच्या कोसबाड येथील नूतन बाल शिक्षण संघाच्या विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे (डी.एड. कॉलेज) २००८-९ या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल १२ वर्षांनंतर स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले. या वेळी त्यांनी येथील शिक्षण घेत असतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विकासवाडी अध्यापक विद्यालयाच्या वतीने रविवारी (ता. ३०) माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर हे प्रमुख पाहुणे; तर विद्यालयाच्या प्राचार्या संजना कदम या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच विद्यालयाचे माजी प्राचार्य मनोहर सैंदाणे, संतोष लुले व प्राध्यापक शंकर जोंधळे, सुनील गायकवाड, व्यवस्थापक काशिनाथ कदम, खजिनदार सुधीर कामत, सदस्य संजू जोशी आदी उपस्थित होते. या मेळाव्यास २००८-९ च्या बॅचचे ३० माजी विद्यार्थी हे महाराष्ट्रातील विविध भागांतून कोसबाड येथे आले होते. कॉलेजचे माजी प्राचार्य मनोहर सैंदाणे, संतोष लुले, शंकर जोंधळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी मीनाक्षी सोनार, कीर्ती पाटील, विद्या राऊत, अनुराधा चव्हाण, नरोत्तम भोये आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी झाले भावुक
या मेळावा कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी येथे शिकलेल्या शिक्षणाचा अनुभव व त्याचा पुढील आयुष्यात झालेला फायदा सांगत कॉलेजजीवनातील आठवणींना उजाळा दिला. कॉलेजमधील जुने दिवस आठवून अनेक विद्यार्थी भावुक झाले होते.