वज्रेश्वरी दुहेरी हत्याकांडातील मारेकरी गजाआड
न्यायालयाने ठोठावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार) : अकलोली येथील पेंढरी पाडा येथे वयोवृद्ध दाम्पत्याची अज्ञात कारणाने धारदार शस्त्राने रात्रीच्या वेळी घरातच हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोन आरोपींना गणेशपुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून गजाआड केले. त्यांना भिवंडी सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जगन्नाथ पाटील (वय ८३) आणि त्यांची पत्नी सत्यभामा पाटील (वय ७५) हे वयोवृद्ध पती-पत्नी रस्त्यालगतच्या घरात दोघेच शेती करून राहत होते आणि त्यांनी शेतातील तलाव मत्स्यपालनासाठी भाड्याने दिला होता. सदर तलावावर देखरेखीसाठी भाडेकरूने उत्तर प्रदेशमधील तीन व्यक्ती नेमल्या होत्या. २२ जानेवारीच्या सकाळी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले होते. पोलिसांनी चौकशी केली असता सदर तलावावरील देखरेखीसाठी असलेल्या समशुल्ला ऊर्फ समीर खान याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. दोन व्यक्ती घटनेच्या रात्री गावी जातो म्हणून निघून गेल्याचे समजले. गणेशपुरी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील लखनऊ, बलरामपूर येथून मकसूदआलम मोहरमअली खान, रोहिज दयाराम कनोजिया यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचे कबूल केले. त्यांना तेथील न्यायालयात हजर करून सोमवारी गणेशपुरी पोलिस ठाण्यात आणून मंगळवारी भिवंडी न्यायालयात हजर केले.
चौकट
हत्येचे कारण अस्पष्ट
दरम्यान, सदर आरोपींनी हत्या केली की त्यांच्याकडून कोणी करून घेतली हे अजून निष्पन्न झाले नाही. गणेशपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गावडे अधिक तपास करीत आहेत.