
वाढत्या प्रदूषणाचा पारंपरिक मासेमारीला फटका; मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाची झळ
उरण : गेल्या काही वर्षांत उरण, पनवेलच्या विविध खाड्यांमध्ये प्रदूषण (Pollution in creek) वाढले आहे. प्रदूषणामुळे किनारा परिसरात आढळणाऱ्या विविध माशांच्या जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना मत्स्य दुष्काळाची झळ (Impact on Fishing) सोसावी लागत आहे. उरण-पनवेल परिसरातील करंजा, मोरा, हनुमान-कोळीवाडा, पाणजे, खोपटा, वशेणी, न्हावा, गव्हाण, कोपर, उलवा ही गावे पारंपरिक मासेमारीसाठी प्रसिद्ध असून किनाऱ्यावर कोळी समाजाची (Koli Fishermen) मोठी वस्ती आहे.
हेही वाचा: माणगाव काळनदीच्या पात्रात मगरीची दहशत; मच्छीमारावर हल्ला
परिसरातील खाडी, किनारपट्टीवर मिळणारे बोंबील, ढोमी, मांदेली, घोळ, कलेट, कोलंबी, शिंगाली, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या, कोळीम, बोईट, पाखट, बाकस, हेकरू, तांब, मुशी, रावस, जिताडा, शेवंड, पाला, करपाल, टायनी-कापसी कोळंबी, इत्यादी माशांचे प्रकार आढळतात. हेच मासे कोळी बांधवाना दैनंदिन रोजीरोटी मिळवून देतात. परंतु गेल्या काही वर्षात या व्यवसायात अनेक अडचणी उद्भवू लागल्या आहेत.
वाढत्या जल प्रदूषणामुळे व्यवसायावर मोठे संकट ओढावले आहे. किनाऱ्यालगत आणि खाडीत मासळीचे प्रमाण घटले आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने मुंबई व लगतच्या किनारपट्टी परिसरात केलेल्या संशोधनानुसार, मुंबई, रायगडच्या सागरी व खाडी परिसरात १२५ माशांच्या जाती आढळत होत्या. त्यापैकी फक्त ७८ जाती सध्या शिल्लक आहेत.
पनवेल कोळीवाडा, गव्हाण, कोपर हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळ बाधित झाले आहे. तर उरण तालुक्यांतील हनुमान कोळीवाडा, पाणजे, मोरा, घारापुरी, न्हावा, गव्हाण हा भाग जेएनपीटी बंदर, शिवडी-न्हावा सी-लिंक या प्रकल्पामुळे बाधित झाला आहे.
हेही वाचा: एसटीला आर्थिक फटका; रायगड जिल्ह्यातील ४५० एसटी कर्मचारी बडतर्फ
करंजा, केगाव, खोपटा, आवरा, वशेणी आदी समुद्र किनारा, खाडी परिसर ओएनजीसी आणि जेएसडब्ल्यू आणि परिसरात उभारण्यात आलेल्या कंटेनर यार्ड आणि बंदरांमुळे बाधित झाला आहे. तिसरी मुंबई घोषित केल्याने या भागात येणारे नवे प्रकल्प, कोस्टल रोड, बंदरे, जेटी आदी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली खारफुटीची बेसुमार कत्तल केली जात आहे. दूषित रासायनिक मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र, खाड्यामध्ये सोडण्यात येते. वाढत्या प्रदूषणामुळे विविध माशांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. यामुळे माशांचे प्रमाण कमी झाले आहे. मासेच मिळेनासे झाल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आल्याची माहिती पारंपरिक मच्छीमार संघटनेचे दिलीप कोळी यांनी दिली.
वाढत्या जलप्रदूषणामुळे फिशिंग एरिया, ब्लिडिंग ग्राउंड नष्ट झाले आहेत. जेएनपीटी परिसरात असलेल्या १० हजार किलो क्षमतेच्या रासायनिक साठवणूक टाक्या साफ केल्यावर त्याचे पाणी समुद्रात, खाड्यामध्ये सोडण्यात येते. खाड्या आणि समुद्राची मुख भराव टाकून बंद केली आहेत. यामुळे पाच पटीने चिखलाचे थर वाढले आहेत. त्यामुळे पारंपरिक मासेमारी धोक्यात आली आहे.
- तुकाराम कोळी, सदस्य, मच्छीमार बचाव समिती
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..