
बेलापूर वॉटर टॅक्सीला अल्प प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : मेरीटाईम बोर्डाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या बेलापूर वॉटर टॅक्सीला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. महागड्या तिकीट दरामुळे प्रवाशांनी देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीकडे पाठ फिरवली आहे. आताच ही सेवा सुरू झाल्याचे तिकीट महाग आहे, प्रवासी संख्या वाढल्यानंतर तिकीट दरात कपात होऊ शकते, असे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेलापूर येथील रेतीबंदर परिसरात नव्याने तयार केलेल्या जेटीहून भाऊचा धक्का, घारापुरी आणि जेएनटीपी बंदर अशा तीन मार्गांवर मेरीटाईम बोर्डाने जलवाहतूक सुरू केली आहे. जलद प्रवासाकरिता स्पीड बोट आणि धिम्या प्रवासाकरिता कॅटामरान प्रकारातील बोट अशा दोन सुविधा देऊ केल्या आहेत. परंतु या दोन्ही सुविधांचे तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला न परवडणारे आहेत. गुरुवारी, १७ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नौकावहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या जलसेवेचा आणि जेटीचे लोकार्पण झाले. त्यानंतर बेलापूर ते भाऊचा धक्का या मार्गावर शुक्रवारपासून रविवारपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशी दोन स्पीड बोटींच्या फेऱ्या घारापुरी दरम्यान झाल्या. परंतु या दोन्ही फेऱ्या फक्त दोन तासांसाठी असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
जल प्रवासादरम्यान संबंधित कंपनीने सुरक्षेबाबतचे सर्व उपाय आणि सुविधा दिल्या होत्या. बेलापूरहून स्पीड बोट सुटल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांत घारापुरी बेटाजवळ पोहोचते. त्या ठिकाणी दोन तासांची प्रतिक्षा केल्यानंतर तीच बोट प्रवाशांना घेऊन पुन्हा बेलापूर जेटीला येते.
अवघ्या दोन तासांत घारापुरी दर्शन कसे?
घारापुरी बेटावर सोडल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये पुरातन काळातील तोफा, कोरीव गुहा, शिवलेणी, जंगल, धरणे आदी भाग पाहून होत नसल्याची तक्रार पर्यटकांनी केली. त्यामुळे बेलापूरहून घारापुरीला जाणाऱ्या स्पीड बोटीचे दर कमी करून प्रतीक्षा वेळ वाढवण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे. मंगळवार ते रविवार या दरम्यान सकाळी दोन फेऱ्या घारापुरी दरम्यान चालवण्यात येणार आहेत.
प्रवाशांना लेव्हीचा भूर्दंड
बेलापूर जेटीचे लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावर एकही प्रवासी बोट अद्याप सुरू झालेली नाही. सोमवारी, २१ फेब्रुवारीला सकाळी ८.४५ वाजता पहिली प्रवासी बोट सुटणार आहे. तर भाऊचा धक्काहून परत बेलापूरला साडेपाच वाजता बोट सुटणार असल्याचे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बेलापूरहून नोकरदार वर्गाला भाऊचा धक्का आणि जेएनपीटी या जलमार्गाद्वारे कमी वेळेत मुंबई गाठता शक्य होणार आहे. ५५ सीटची क्षमता असणाऱ्या कॅटामरान या धिम्या गतीच्या बोटीकरिता २९० रुपये इतके दर आकारण्यात आला आहे. तर ३५ मिनिटांत जाणाऱ्या स्पीड बोटीचे तिकीट ८२५ रुपये आहे. या तिकीटावर दहा टक्के लेव्ही आकारली जाणार असल्याने दोन तिकीटे खरेदी केल्यास १५० रुपयांचा भूर्दंड प्रवाशांना सोसावा लागणार आहे.
आम्ही इकडे तिकीट बुकिंगला आलो होतो. परंतु ऑनलाईन तिकीट असल्यामुळे आम्हाला तिकीट मिळाले नाही. कधीतरी फिरायला जाण्यासाठी बोट सेवा ठीक आहे. पण रोजच्या प्रवासासाठी आकारण्यात आलेले दर खूपच महागडे आहेत. सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत.
- विजय मानकर, प्रवासी, बेलापूर
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..