
कोळीवाड्यातील जमिनी बळकावण्यासाठी कारस्थान!
मुंबई, ता. २० : कफ परेडच्या कोळीवाड्यातून नरिमन पॉइंटपर्यंत जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलास मच्छीमारांनी विरोध दर्शविला आहे. मुळात हा उड्डाणपूल असेल का किनारा महामार्ग, हे अजून निश्चित नाही. कोळीवाड्यातील जमिनी बळकावण्यासाठी हे सारे कारस्थान असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार नेत्यांनी केला आहे.
मरिन ड्राईव्ह ऊर्फ क्वीन्स नेकलेस हा ट्रायडंट हॉटेल-एनसीपीएच्या परिसरात सुरू होतो. त्यापुढे समुद्र हद्द असून दोन किलोमीटरचा समुद्र ओलांडला की समोर वर्ल्ड ट्रेड सेंटर, प्रेसिडंट हॉटेल आहे. प्रेसिडंट हॉटेलपासून बधवार पार्क, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय व नरिमन पॉइंट या गर्दीच्या मार्गातून जाण्याऐवजी उड्डाणपूल किंवा किनारा महामार्ग काढण्याचा एमएमआरडीए प्रशासनाचा विचार आहे. मात्र याने फारसा फायदा होणार नाही, उलट कोळीवाडे उद्ध्वस्त होतील, अशी भीती मच्छीमार नेते व्यक्त करीत आहेत.
उड्डाणपुलासंदर्भात कफ परेडच्या मच्छीमार वसाहतीतील कोळी बांधवांना माहिती देण्यासाठी नुकतीच दक्षिण मुंबईचे शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी बोलावलेल्या बैठकीत मच्छीमार नेत्यांनी या उड्डाणपुलास प्रखर विरोध दर्शविला. हा उड्डाणपूल येथील मच्छीमार बंदरावरून जाणार असल्याने ते बंदर उद्ध्वस्त होऊ शकते. वादळवाऱ्यात नौका नांगरून ठेवण्यासाठी हे सुरक्षित बंदर आहे. त्यामुळे या उड्डाणपुलासाठी आमचा व्यवसाय उद्ध्वस्त करू नये. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र आमची रोजीरोटी बुडवू नये, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
अद्यापही येथून उड्डाणपूल होणार की रस्ता, याचे निश्चित उत्तर मिळत नाही. प्रशासनाने दोन्ही पर्याय खुले ठेवले आहेत. प्रकल्पाचा आराखडा किंवा नीट माहितीही मिळाली नाही. वस्तीवर बिल्डरचा पहिल्यापासून डोळा असून जमीन लुबाडण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे.
- देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती.
आरोपांच्या फैरी
१) भरतीरेषेपासून ५० मीटर अंतरात असलेल्या या कोळीवाड्याला सीआरझेडचे संरक्षण असल्याने त्यातून बाहेर काढण्याचे हे षड्यंत्र आहे. समुद्रात ३०० मीटर अंतरावर ग्रीनपार्क व त्यापलिकडे रस्ता बांधला जाईल. त्यामुळे कोळीवाडा साहजिकच भरतीरेषेच्या ५० मीटरच्या बाहेर जाईल व येथे एसआरए योजना येईल, अशीही भीती देवेंद्र तांडेल यांनी व्यक्त केली.
२) दहा वर्षांपूर्वी येथे व्यापारी संकुल उभारण्याचा चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प होता. आता त्याचे मूल्य दुप्पट झाले असावे, असा अंदाजही त्यांनी वर्तविला. हा कोळीवाडा तीन ते चार एकर क्षेत्रावर असल्याने यातून किती पैसे मिळतील हा अंदाज सहज काढता येतो, असेही ते म्हणाले.
मच्छीमारांना बसणारा फटका
कफ परेडला मच्छिमार बोटी - २००
अवलंबून असलेले नागरिक, विक्रेते १०,०००
व्यवसायावर अवलंबून असलेले रहिवासी २०,०००
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..