
यांना शिस्त कोण लावणार?
नवीन पनवेल, ता. २४ (वार्ताहर) : पनवेल महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरामुक्ती ही संकल्पना हाती घेतली आहे. यासाठी संपूर्ण महापालिका क्षेत्रात कचरा टाकण्याच्या ठिकाणी सुशोभीकरण केले जात आहे. येथे कचरा टाकू नये, अशा प्रकारचे आकर्षक व विनंती करणारे फलक लावण्यात आले आहेत. परंतु, याच फलकाच्या जागी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांना कोण शिस्त लावणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वच्छता घरात असो की सार्वजनिक ठिकाणी, ती राखण्याची सवय सर्वांनी अंगीकारली पाहिजे. काही ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी शिस्त लागावी, यासाठी काही मंडळी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. ‘कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल’, ‘दंड ठोठावला जाईल’ ‘हुकमावरून’ अशा युक्त्या वापरल्या जातात. मात्र, याही युक्त्यांना कुणी बघत नाही म्हटल्यावर आक्रमक पवित्रा घेतला जातो. तरीही सवय जात नाही. ‘कचरा टाकू नये,’ अशी सूचना अगदी कचऱ्याच्या ढिगाला लागूनच असते. काही ठिकाणी मजकुरातली भाषा थोडी आक्रमक झाली आहे. सुरुवातीला ‘कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होईल’, ‘हुकमावरून’, त्यानंतर ‘दंड होईल’, मग ‘कचरा टाकणारे नालायक’, पुढे ‘कचरा टाकणारे मूर्ख’, असे सूचना फलक लिहिले जातात. परंतु, त्याला कुणी जुमानत नाही.
पनवेल महापालिकेने अगदी आर्जव विनंत्याचे सूचनाफलक पालिका क्षेत्रात लावले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पनवेल महापालिका स्वच्छतेच्या दृष्टीने पुढाकार घेऊन काम करत आहे. पूर्वी ज्या ठिकाणी कचरा टाकला जात होता त्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या होत्या. नंतर त्या काढून पालिकेच्या घंटागाड्या नागरिकांच्या दारात सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा कचरा गोळा करत आहेत. तरीही काही नागरिक घरातील कचरा संबंधित ठिकाणी टाकून परिसर अस्वच्छ करत आहेत. सदर जागेवर कचरा टाकू नये, अशा प्रकारचे विनवणी करणारे फलक लावण्यात आले आहेत. परंतु, नागरिक ते फलक का वाचत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
----------------------------
ूपर्यावरणपूरक बाग
पनवेल महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना यशस्वी केली आहे. मात्र, कचराकुंडी नसल्याने अनेक जण त्याच ठिकाणी घंटागाडीची वाट न पाहता कचरा टाकत आहेत. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आल्याने नुकतेच कळंबोलीत पर्यावरणपूरक बाग तयार केली आहे. या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न पालिकेने केला असून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्माण करून आपला परिसर आकर्षक कसा करायचा, याचे जीवंत उदाहरण मांडले आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक स्वच्छता अभियानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
----------------------------
‘कचरा टाकू नये’ अशी सूचना अगदी कचऱ्याच्या ढिगाला लागूनच आहे. कचरा टाकणारे हा संदेश वाचत नसतील असे नाही. पनवेल शहर साक्षर आहे. सगळेच जण सूचना वाचत असतील. आपले शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने पालिका प्रयत्न करत आहे. कृपया नागरिकांनी कचरा टाकून शहरात अस्वच्छता पसरवू नये.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..