
सॅनिटायईरची मागणी अवघी १५ टक्के
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : शहरातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ही मागणी त्यामुळेच अवघी १० ते १५ टक्क्यांवर आली आहे.
नवी मुंबईत दररोज नवीन सापडणाऱ्या कोरोना रुग्ण संख्या १०० पेक्षा कमी आहे. बहुसंख्य नागरिकांनी प्रतिबंधक लस ही घेतल्याने या साथीची भीतीही कमी झाली आहे. त्यामुळेही बेफिकीर वाढू लागली आहे. त्याचाच परिणाम म्हणून स्वच्छतेच्या दृष्टीने वापरण्यात येणाऱ्या सॅनिटायझरचा वापर गेल्या काही महिन्यांपासून कमी झाला. गेल्यावर्षी कोरोनाला सुरुवात झाली त्यावेळी या आजाराच्या उपचाराविषयी माहिती नव्हती. त्यामुळे सॅनिटायझरने हातांची स्वच्छता केल्यास सुरक्षित राहिले जाऊ शकते, असे बहुसंख्य नागरिकांना वाटत होते.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाची साथ सुरू झाली त्या वेळी सॅनिटायझरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या होत्या. वाढलेल्या मागणीमुळे अनेकांनी गैरफायदा घेतला. नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याने राज्य सरकारनेच्या सूचनेनुसार दर कमी करण्यात आले होते.
दरम्यान, नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. व्यवहार पूर्ववत सुरू आहेत. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. मात्र, स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या सॅनिटायझरकडे त्यांनी पाठ फिरविली आहे.
या संदर्भात समीर जाधव या तरुणाने ‘सकाळ’ला सांगितले की, कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे, हे दिलासादायक आहे. तिसरी लाट तर संपुष्टात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात कोरोनाचे भय राहिले नाही. अनेकांनी प्रतिबंधक लस घेतली आहे. त्याचाही परिणाम दिसतो. सॅनिटायझर वापरण्यापेक्षा आणि साबणाला प्राधान्य देत आहे. जाधव यांच्याप्रमाणेच अनेक नागरिकांचे मत आहे.
औषधांच्या दुकानदारांनीही सॅनिटायझरची मागणी कमी झाल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपेक्षा यंदा १५ ते २० टक्केच मागणी आहे.
.....
दृष्टिक्षेप
- कोरोना लाटांच्या काळात सॅनिटायझरला मोठी मागणी
- वाढत्या मागणीनंतर अनेक कंपन्यांनी बाजारात विविध सुगंधांसह विविध रंगांचे सॅनिटायझर विक्रीसाठी आणले
- सुरुवातीला सॅनिटायझरसाठी अवाजवी दर आकारणी
- गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा मागणी १५ टक्क्यांवर
.....
कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात सॅनिटायझरला प्रचंड मागणी होती. पहिल्या दोन लाटांच्या वेळी तर तुटवडा निर्माण झाला होता; पण गेल्या महिन्यांपासून मागणी कमी झाली आहे. ती अवघी १५ ते २० टक्के आहे.
- प्रवीण काटकर, श्री सद्गुरू कृपा केमिस्ट, वाशी गाव
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..