
विद्यार्थ्यांची रिक्षातून धोकादायक वाहतूक
वसई, ता. २४ (बातमीदार) ः कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. अनेक पालक आपल्या मुलांना विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाने शाळेत पाठवत आहेत. मात्र क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी रिक्षात बसवून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे शहरात निदर्शनास येत आहे.
गुराढोरांप्रमाणे मुलांना रिक्षातून कोंबून ने-आण केली जात आहे. विद्यार्थ्यांचे दप्तरदेखील रिक्षाच्या बाहेर लटकताना दिसून येते. मात्र त्याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत. विशेष म्हणजे पालकांनादेखील आपल्या मुलाला अशा पद्धतीने रिक्षातून पाठविताना चिंता वाटत नाही.
वसई-विरार शहरातील शाळेत जाण्यासाठी मुलांना पालकांकडून खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. यात रिक्षा, बस, जीप आदींचा समावेश आहे. वाहतूक करताना आवश्यक असलेले कोणतेही सुरक्षिततेचे उपाय किंवा नियमांचे पालन केले जात नाही. रिक्षात अधिक मुले असतील तर कमी भाडे आकारणी होईल याकडे पालक पाहत आहेत. मात्र यामुळे मुलांच्या सुरक्षिततेकडे पालक दुर्लक्ष करत आहेत. शिवाय पालिकेच्या बसमधून प्रवास करणारी अनेक शाळकरी मुले बसच्या दारात उभी असतात. त्यामुळे सजग नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र वसई-विरार शहरात नियमांची पायमल्ली होताना दिसते. क्षमतेपेक्षा अधिक मुलांना घेऊन वाहने प्रवास करतात. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक विभागाकडे कारवाईची मागणी करणार आहोत.
- अनिकेत पाटील, उपाध्यक्ष, वसई-विरार जिल्हा युवक, काँग्रेस.
विद्यार्थी क्षमता व नियम वाहनांना आखून दिले आहेत, जर याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली जाणार आहे. अशा वाहनांची तपासणी उपप्रादेशिक विभागाकडून करण्यात येणार आहे.
- दशरथ वाघुले, अधिकारी, उपप्रादेशिक विभाग.
शाळेच्या बसमधील विद्यार्थी दरवाज्याजवळ उभे असतात. त्यामुळे दरवाजे बंद असावेत. रिक्षात किती संख्या असावी याबाबत देखील पोलिस यंत्रणा व स्थानिक महापालिकेने लक्ष घातले पाहिजे.
- दीप्ती जठार, पालक, वसई.
बेकायदेशीर रिक्षांचे प्रमाण वसई-विरार शहरात वाढत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अक्षरशः कोंबून विद्यार्थ्यांना ने-आण करणारी वाहने दिसतात.
- जयेंद्र भोईर, नागरिक, गावराईपाडा.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..