
"यशाच्या उंचीवरून अधोगती होऊ न देता नवे शिखर गाठा"
मुंबई : नेतृत्व करणे ही भूमिका क्रांती, संकट आणि गरजेतून निर्माण होते; पण ‘यिन’ ही समृद्धीतून (young inspiration network) तयार होणारी लिडरशिप आहे. नेतृत्व जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा ती एक जबाबदारी असते. जबाबदारी (Responsibility) घेणे म्हणजे, एखादी भूमिका घेऊन त्या प्रश्नासाठी सातत्याने काम करत राहणे. आपले मुद्दे तटस्थपणे मांडणे, बंड करणे, प्रवाहाच्या विरोधात जाऊन आपली भूमिका मांडणे, या नेतृत्व करण्याच्या बाजू आहेत, असे मत महसूल व वन मंत्रालयाचे सहसचिव संजय इंगळे (sanjay ingale) यांनी व्यक्त केले. ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलताना त्यांनी युवकांना यशाच्या उंचीवरून अधोगती होऊ न देता नवे शिखर निर्माण करण्याची ऊर्जा दिली.
हेही वाचा: मुंबईतील ३०७ शाळा तंबाखूमुक्त; उपक्रम राबवताना मात्र सरकारी धोरणांचा अडसर
‘यिन’ मंत्रिमंडळाला मार्गदर्शन करताना इंगळे म्हणाले, की करिअर करायचे म्हणजे डॉक्टर बनायचे, इंजिनिअरिंग करायचे, अशी स्वप्ने असतात; पण समाजकारण वा राजकारण हे असे कोणी ठरवून करत नाही. महाराष्ट्राने वेगवेगळी रत्ने घडवली. प्रत्येकात एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. माझ्यामध्ये काय वेगळे हे शोधणे गरजेचे आहे. मी कृषी विभागात बरेच काम केल्याने त्यात असे म्हणतात की, रोपटे कोणतेही असूदे; पण बियाणे जर चांगले दिले तर त्यातून चांगले पीक येते. असेच आपलेही कष्ट करण्याची ताकद असेल, तर त्याचे यशही मोठे असते.
इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात जीवनातील आनंदाचे अन् यश-अपयशाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ‘मी माझ्या आनंदाच्या संकल्पना पुढे ढकलल्या आहेत. जसे की, माझ्या आयुष्यात काही तरी चांगले घडले, तरच मी त्याचा आनंद साजरा करायचो. असेच आपल्या जीवनाचे असते. जीवन सुरू राहते; पण ते कसे जगतो हे महत्त्वाचे आहे. यश-अपयश हे भाषेचे दोन पैलू आहेत. एखाद्या प्राण्याचे उदाहरण घ्या. त्याला पहिल्या प्रयत्नात शिकार मिळाली नाही, तर तो स्वत:ला टोचत बसत नाही किंवा आत्महत्याही करत नाही. तो त्याच्या आई-वडिलांनाही दोष देत नाही. तसेच आपल्यालाही आयुष्यात पुढे जाता आले पाहिजे. सकारात्मकता, सृजनशीलता हीच समृद्धीची प्रमुख शिदोरी आहे. विचारांचे बियाण पेरणे ही कायमस्वरूपी प्रक्रिया आहे. कोणतेही करिअर चांगले किंवा वाईट नसते. एखाद्या व्यवसायातून भरपूर पैसे मिळतात, तर एखाद्या नाही, असेच आयुष्य असते.’
हेही वाचा: अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार ?
‘सुपर पॉवर’ होण्यासाठी प्रयत्न करा!
जी वाट कोणी चोखाळलेली नाही, अशा वाटेवर चालणे म्हणजे ट्रेंड सेट करणे. जगापेक्षा काहीतरी वेगळे करणे यालाच नवा ट्रेंड, असे म्हणतात. जगात सर्वात तरुणाई भारतात आहे. भारत २०२२ मध्ये सुपर पॉवर होणार, हे स्वप्न एपीजे अब्दुल कलाम यांचे होते. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. बदल घडवण्याची गरज आपल्यापासून सुरू झाली पाहिजे. आजच्या अधिवेशनातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्यातले वेगळेपण, स्वतंत्रपण हे तसेच असले पाहिजे. आपल्या पिढीला स्मार्ट पिढी असे म्हटले जाते; पण स्मार्टचा अर्थ गॅलॅक्सीसारखा आहे, असे मार्गदर्शन संजय इंगळे यांनी केले.
मी आणि जग, असा विचार हवा
स्मार्ट म्हणजे व्यवस्थापन. जर तुम्ही घराचे कॅप्टन होणार असाल, तर घरातील प्रत्येकाचे सहकार्य मिळवणे, ही आपली मुख्य भूमिका आहे. ए - स्वीकारणे... आर - रिसोर्स, म्हणून मी माझा योग्य वापर केला पाहिजे. सर्वांना एक गोष्ट सामान्य दिली गेली आहे, ती म्हणजे वेळ. त्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. टी म्हणजे, ट्रान्स्परन्सी... आमूलाग्र बदल. स्वत:तच नाही तर प्रत्येकामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणता येतो. मी विरुद्ध जग, यापेक्षा मी आणि जग, असा विचार दृढ झाला पाहिजे, असेही इंगळे म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..