तुम्ही आपल्या प्रयत्नाने विश्वाची दिशाही बदलू शकता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही आपल्या प्रयत्नाने विश्वाची दिशाही बदलू शकता!
तुम्ही आपल्या प्रयत्नाने विश्वाची दिशाही बदलू शकता!

तुम्ही आपल्या प्रयत्नाने विश्वाची दिशाही बदलू शकता!

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः सूर आणि ताल जुळले तर आयुष्य छान होते. आयुष्य सुंदर आहे, हे आपण आपल्या मनावर बिंबवायला हवे. आयुष्य जगत असताना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे. योग्य कृती केलीत तर तुम्ही आपल्या प्रयत्नाने विश्वाची दिशाही बदलू शकता, असे विचार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी मांडले. सकारात्मक विचारांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासावर भर देऊन आपले आणि इतरांचे जगणे अधिक सुंदर करण्याचा मूलमंत्र त्यांनी यिन मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दिला.
समाजाची जडणघडण, संस्कृती आणि विकासामध्ये स्त्रीचे मोठे योगदान आहे. स्त्री ही विश्वाची निर्माती आहे. तुम्हाला-आम्हाला तिनेच जन्म दिला आहे, म्हणजेच निर्माण केले आहे. त्यामुळे स्त्रियांचा नेहमी आदर करा, अशी शिकवणही डॉ. भोसले यांनी दिली. ज्या घरात स्त्री स्वातंत्र्य असते त्या घराची नेहमी प्रगती होते, असेही ते म्हणाले. आयुष्यामध्ये कितीही संकट, प्रश्न वा अडचणी आल्या तर त्याचा शांतचित्ताने सामना करा. त्यांवर कशा प्रकारे मात करता येईल, याचा विचार करा. संकट नक्की निघून जाईल. संकटाला कधीही मोठे होऊ देऊ नका. स्वतःला संकटाहून मोठे करा, म्हणजे संकटे राहणार नाहीत, असा सल्लाही त्यांनी दिला. व्यक्तीने आपल्या आयुष्यात कृतिशील राहणे गरजेचे आहे. भूतकाळामध्ये फार काळ रमू नये. भूतकाळ चांगला असो की वाईट, तो आपल्याला बदलता येत नाही. त्यामुळे त्याचा फार विचार न करता भविष्याकडे उघड्या डोळ्यांनी बघा. गोष्ट भूतकाळातील असो की भविष्यातील, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक राहा, असे ते म्हणाले. राग ही भावना अतिशय वाईट आहे. त्याच्या आहारी कधीही जाऊ नका. नेहमी मोठे मन ठेवा. माफ करायला शिका. एखाद्याचा राग आला किंवा काही चूक झाली तर तिथेच सोडून द्या. आपले चित्त कायम प्रसन्न ठेवा आणि नेहमी आनंदोत्सव साजरा करा, असे डॉ. नामदेव भोसले म्हणाले.

अपेक्षाभंग झाल्यावरही आनंदी राहणे हेच आयुष्य आहे. आपण कसा आणि काय विचार करतो यावर आयुष्याची दिशा अवलंबून आहे. आपल्याला आयुष्यात जे हवे आहे, जे करायचे आहे त्यावरच बोलायचे. आयुष्यात कृती, ध्यान, भक्ती आणि ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. मन शुद्ध ठेवणे, शरीर तंदुरुस्त राखणे आणि पंचतत्वाचे शुद्धीकरण करणे महत्त्वाचे आहे. गरिबीमुळे कधीही खचून जाऊ नका. गरिबी ही ताकद आहे हे नेहमी लक्षात ठेवा, असा सल्लाही डॉ. भोसले यांनी दिला.

कृतिशील व्हा, श्रम करा!
आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जशी दृष्टी तशी सृष्टी, हे तत्त्व जपा. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी निमित्त शोधू नका. काही चांगले करायचे असेल तरच निमित्त शोधा. तुम्ही जसे कर्म कराल त्याप्रमाणे शरीर साथ देणार. योग्य कृती केलीत तर तुम्ही आपल्या प्रयत्नाने विश्वाची दिशाही बदलू शकता. त्यामुळेच कृतिशील व्हा, श्रम करा, ऐकण्याची कला विकसित करा. चांगले ऐकले तर त्यातून चांगले घडेल, असे डॉ. नामदेव भोसले म्हणाले.


आयुष्य घडवणारे मुक्त विद्यापीठ करायचे आहे!
जगामध्ये शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, मात्र आयुष्य घडवणारे जीवन समजावून सांगणारे विद्यापीठ नाही. त्यामुळे आयुष्य घडवणारे असे मुक्त विद्यापीठ निर्माण करण्याचे माझे ध्येय आहे. आयुष्याबाबतचे पन्नास अभ्यासक्रम तिथे शिकवले जातील, असा ठाम विश्वास डॉ. नामदेव भोसले यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top