
वसई-विरार पालिकेच्या ग्रंथालयात वाचनारंभ
वसई, ता. २६ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या चार ग्रंथालयांत मिळून ६१ हजार मराठी पुस्तके आहेत. याशिवाय भाषांतरित पुस्तकेही आहेत. त्यात अजून भर घातली जाणार असल्याची माहिती ग्रंथपाल अमित मोदी यांनी दिली. दरम्यान, वसईच्या ग्रंथालयात वाचकांसाठी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यात संपूर्ण दिवसभर वाचनप्रेमींना विविध पुस्तके चाळता येणार आहेत. ती खरेदीही करता येणार आहेत.
ग्रंथालयात मराठी काव्यसंग्रह, कादंबरी, चरित्र, नाटक, प्रवास वर्णन, कविता, धर्म, शैक्षणिक, तत्त्वज्ञान, इतिहास, सामाजिक शास्त्र आणि संदर्भ साहित्य, कला, तंत्रविज्ञान यासह स्पर्धा परीक्षा पुस्तके आहेत. वसई पंचवटी येथील ग्रंथालयात २२ हजार, वसई १६ हजार, वसई गाव १५; तर नालासोपारा शहरात आठ हजार अशी एकूण ६१ हजार मराठी पुस्तके आहेत. पालिकेच्या ग्रंथालयात वाचन चळवळ उभारण्यात आली आहे. काही इच्छुक या ग्रंथालयांत येऊन काही तास वाचनाचा आनंद घेतात. यात नोकरदारांचा समावेश आहे. या ग्रंथालयाचे अनेकांनी सभासदत्वही मिळवले आहे.
ग्रंथालय विभागाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे. मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता महापालिकेकडून पुस्तकांचा संचयदेखील दरवर्षी वाढवला जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..