वसईनगरीला मराठीची गोडी कायम
वसई, ता. २६ (बातमीदार) ः वसईची साहित्य नगरी म्हणून ख्याती सर्वश्रुत आहे. मराठी भाषा या मातीत अजूनही घट्ट आहे. अनेक लेखक, कवी, कादंबरीकार, साहित्यिक याच मातीत जन्माला आले. येथील नागरिक परदेशात नोकरीनिमित्त जात असले तरी मराठी बोलीभाषांची गोडी त्यांच्या जिभेवर नेहमीच रेंगाळत असते. अशातच वसई-विरार महापालिकेने देखील वाचन संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी शहरात असणाऱ्या ग्रंथालयांना मराठी साज दिला आहे. महापालिकेने वाचन संस्कृती समृद्ध करत चार ग्रंथालयांत ६० हजारांहून अधिक पुस्तकांचा संचय केला आहे.
पालिकेने काव्यसंग्रह, कादंबरी, चरित्र, नाटक, प्रवास वर्णन, कविता, धर्म, शैक्षणिक, तत्त्वज्ञान, सामान्य ज्ञान, इतिहास, लेख, सौंदर्य साहित्य, सामाजिक शास्त्र, संदर्भ साहित्य, कला, तंत्रविज्ञान यासह स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा अनमोल खजिना जपला आहे. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे म्हणून सुरू असलेली ही चळवळ मोठी झाली आहे. वसई पंचवटी येथील ग्रंथालयात २२ हजार, वसईत १६ हजार, वसई गाव १५, तर नालासोपारा शहरात ८ हजार अशी एकूण ६१ हजार मराठी पुस्तकांचा संग्रह आहे. पालघर जिल्हा, मुंबई व आजूबाजूच्या परिसरातून येथे येणारे चाकरमानीदेखील वेळात वेळ काढून या ग्रंथालयांत वाचन करण्यासाठी भेट देतात.
वसई-विरार महापालिकेच्या चार ग्रंथालयांत हजारो मराठी पुस्तके आहेत. याव्यतिरिक्त अन्य भाषेतील भाषांतरित केलेली मराठी पुस्तकांचा संचय आहे. पुढच्या आठवड्यात यात भर पडणार आहे. मराठी वाचन संस्कृतीला यामुळे वाव मिळत आहे.
- अमित मोदी, ग्रंथपाल, वसई-विरार महापालिका.
ग्रंथ प्रदर्शन
वसईच्या ग्रंथालयात वाचकांसाठी लवकरच प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ज्यात संपूर्ण दिवस वाचन करण्याची संधी मिळणार असून, यावेळी भाषेविषयी सखोल माहितीदेखील वसई-विरार महापालिकेच्या ग्रंथालय विभागाकडून देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.