
ठाणे : विकासकामांना गती मिळणार; अतिरिक्त १४३ कोटी रुपयांचा विशेष निधी
ठाणे : जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी विशेष अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्याला सन २०२२-२३ या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) अतिरिक्त १४३ कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १८ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२२-२३ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी ३९५.८१ कोटी, आदिवासी क्षेत्रातील योजनांसाठी ७३.४४ कोटी आणि समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनांसाठी ७२ कोटींच्या आराखड्यास या वेळी मंजुरी दिली होती.
हेही वाचा: नवी मुंबई : पालिका निवडणुकीत मनसे खाते उघडणार ?
त्यानंतर २४ जानेवारीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत ठाणे जिल्ह्यासाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्ह्यातील आमदार यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणी केली होती. जिल्ह्यात असलेल्या सहा महापालिका, वाढते शहरीकरण, आरोग्य सुविधा, ग्रामीण भागात जनसुविधांची कामे, यासाठी वाढीव निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री शिंदे यांनी केली होती.
निधीवाटपाच्या सूत्रानुसार सध्या ठाणे जिल्ह्यासाठी वाढीव ४७५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बैठकीत घेतला होता. भविष्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अजून निधी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी सांगितले होते. दरम्यान, नियोजन विभागाने २१ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना सन २०२२-२३ या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेचा अंतिम नियतव्यय कळविला आहे. राज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता जिल्ह्यांना नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मंजूर झालेल्या ४७५ कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी १४३ कोटी रुपयांचा विशेष अतिरिक्त निधी मिळाल्याने जिल्ह्याचा एकूण मंजूर निधी आता ६१८ कोटी इतका झाला आहे.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..