पलावा जंक्शनमध्ये अनधिकृत बांधकामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पलावा जंक्शनमध्ये अनधिकृत बांधकामे
पलावा जंक्शनमध्ये अनधिकृत बांधकामे

पलावा जंक्शनमध्ये अनधिकृत बांधकामे

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १ ः अनधिकृत बांधकामांचे वाढते प्रस्थ आणि त्यावरील कारवाई यामुळे पालिका प्रशासन पहिल्यापासूनच चर्चेत राहिले आहे. पलावा जंक्शन परिसरातदेखील अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी पलावा पुलाचे काम सुरू असून या बांधकामांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तसेच पुलाच्या लगतच ही बांधकामे असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.
या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच बांधकामे अनधिकृत घोषित करुणही त्यावर कारवाई केली जात नसल्याने पालिका आयुक्त निवडणूक फंड गोळा करण्यासाठीच केवळ ही थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे.
पलावा जंक्शन परिसरात अनधिकृत बांधकाम उभारत त्या इमारतीत हॉटेल्स, वाईन शॉप उघडण्यात आली आहेत. अनेकदा पत्रव्यवहार करूनही या अनधिकृत बांधकामावर अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला आहे. पलावा जंक्शन परिसरात देसाई खाडी ते काटई टोल नाका असे पलावा उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अतिरिक्त दोन मार्गिका होणार आहेत. यामध्ये हे अनधिकृत बांधकामदेखील बाधित होत आहे. मात्र अद्यापपर्यंत ते पाडण्यात का आले नाही, हा प्रश्न आम्हालादेखील पडला आहे, असे आमदार पाटील म्हणाले.

अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सर्व्हे झाला, मात्र कारवाई झाली नाही. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर एका खासदारांचा दबाव येत आहे. त्यामुळे कारवाई होत नाही. फक्त नोटीस पाठविली जाते. आयुक्तांनी डिसेंबर महिन्यात घोषणा केली होती की तीन महिन्यात २० हजार अनधिकृत बांधकामे पाडू. त्यामध्ये त्यांनी आरक्षित भूखंड, रस्ते किंवा नव्याने होणाऱ्या बांधकामांना प्राधान्य दिले होते. ज्या हेतूने या कारवाईस सुरुवात केली होती ती पूर्ण होताना दिसत नाही.
- राजू पाटील, आमदार

येथील काही बांधकामे अनधिकृत म्हणून पालिकेने घोषित केलेली आहेत; मात्र हा प्रश्न हा एमएसआरडीसीकडे आहे. एमएसआरडीसीने आम्हाला अद्याप यादी दिलेली नाही. रस्तारुंदीकरणात बाधित असतील, तर त्यांनी आम्हाला लाईन मारून द्यायला हवी. ती अजून दिलेली नाही. ही बांधकामे ग्रामपंचायत काळातील आहेत. एमएसआरडीसी जेव्हा लाईन देईल, तेव्हा आम्ही पुढील कारवाई करू.
- भारत पवार, ई प्रभाग क्षेत्र अधिकारी, कल्याण डोंबिवली पालिका