प्रभाग समितीमधील चकार थांबणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाग समितीमधील चकार थांबणार
प्रभाग समितीमधील चकार थांबणार

प्रभाग समितीमधील चकार थांबणार

sakal_logo
By

वसई, ता. १ (बातमीदार) ः वसई विरार महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विभागाशी संबंधित निर्माण होणाऱ्या अडचणींची पाहणी करून मोठा बदल करण्याचा निर्णय आयुक्त अनिलकुमार पवार यांनी घेतला आहे. या आस्थापना विभागाच्या कामकाजाची सूत्रे यापुढे महापालिका मुख्यालयातून हलणार आहेत. कर्मचाऱ्यांबाबत असलेली अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने होणारा त्रास पाहता अंमलबजावणी केली आहे व नऊ प्रभागातील सर्व आस्थापना विभागाला एकाच छताखाली आणले आहे.
महापालिकेच्या आस्थापना विभागाचे कामकाज हे नऊ प्रभागातून सुरू होते. महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रजा, आरोग्यासंबंधी प्रश्न, निवृत्तीनंतरची कागदपत्रांची तपासणी व पुढील कार्यवाही, निवृत्तीनंतर पेन्शनचे सोपस्कार स्वेच्छानिवृत्ती घेणारे कर्मचारी, निलंबित कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन मिळणे, दैनंदिनी यासह कर्मचाऱ्यांच्या संबंधी सर्व कामे आस्थापना विभागातून होत असतात. हे कामकाज वसई विरार महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीतून सुरू होते. मात्र अनेक प्रकरणात दिरंगाई होते, अनेक प्रकरणे धूळ खात पडतात. निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावे यासाठी लागणारी कागदपत्रे असोत की, रजेच्या वेळी आरोग्यासंबंधी कार्यवाही याबाबत कामे संथपणे होत होती. याबाबत आयुक्त अनिलकुमार पवार यांनी तक्रारीनंतर लक्ष घातले व त्यांच्या या गंभीर बाबी निदर्शनास आल्या. त्यांनी २०१८ पासून २०२० पर्यंतचा आढावा घेतल्यावर १० ते १२ प्रकरणे प्रलंबित असल्याचे समोर आले.
त्यामुळे आस्थापना विभागातील स्थायी व ठेका पद्धतीचे अधीक्षक, टंकलेखक, लिपिक, शिपाई अशा एकूण ३६ कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे. सर्व प्रभाग समितीच्या आस्थापना विभागाचे एकत्रीकरण करून एक प्रमुख अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त अशी आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रकरणे लवकर मार्गी लागतील.

आस्थापना विभागातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, हे निदर्शनास आले. त्यामुळे मुख्यालयातून या विभागाचा कारभार सुरू केला जाणार आहे. प्रभाग समितीतील आस्थापना कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. यापुढे निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली लावणे, कर्मचाऱ्यांना रजा, दैनंदिनी कारभार सोपा होणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, महापालिका

कर्मचाऱ्यांकडून स्वागत
एकाच ठिकाणी विभागाचे कामकाज सुरू होणार असल्याने स्वेच्छानिवृत्ती, निवृत्त होणारे, आरोग्य, रजा याच्या नोंदी ठेवणे सुलभ होणार आहे. प्रकरणे प्रलंबित न राहता निकाली निघणार असल्यामुळे कर्मचारीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.